काळसे गावातील पूरग्रस्तांना आमदार वैभव नाईक यांनी केले मदतकार्य…

2

जेवणाची सोय तसेच चादर, ताडपत्रीचे केले वाटप…

मालवण, ता. ७ : मुसळधार पावसामुळे तालुक्यात उद्धवलेल्या पूरस्थितीची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज पाहणी केली. पुराच्या पाण्याखाली घरे गेलेल्या काळसे बागवाडीतील लोकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले असून त्याठिकाणी आमदार नाईक यांनी भेट दिली. यावेळी लोकांच्या जेवणाची सोय, चादरी, ताडपत्री असे साहित्य त्यांनी तत्काळ उपलब्ध करून दिले. याबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.
सिंधुदुर्गात गेले चार दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी लोकांची घरे तीन ते चार फूट पाण्याखाली गेली आहेत. काळसे बागवाडीतील पूरग्रस्तांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. या लोकांचे जगणे अत्यंत मुश्कील बनले असल्याने लोकांना मदत कार्य करण्यासाठी आमदार वैभव नाईक हे सरसावले असून आज त्यांनी काळसे गावास भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. तसेच अन्य ठिकाणी स्थलांतरित केलेल्या बागवाडीतील लोकांची आमदार नाईक यांनी भेट घेऊन मदतकार्य केले. सर्व पूरग्रस्तांची जेवणाची सोय केली. चादर, ताडपत्री असे साहित्यही त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे लोकांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. नुकसानग्रस्तांना शासनाची पाच हजार रुपयांची तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी महसूल प्रशासनास दिल्या.

3

4