काम जमत नसेल तर राजीनामे द्या:आक्रमक लोकांनी अधिका-यांना ठणकावले
सावंतवाडी.ता,८: वारंवार निर्माण होणाऱ्या विजेच्या प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी आज येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांना घेराव घातला.
यावेळी नागरिकांना चांगली सेवा दिली जात नाही. शहरात अनेक समस्या आहेत, कार्यालयात संपर्क साधल्यानंतर फोनवर चांगली उत्तरे दिली जात नाही, अधिकारी मोबाईल उचलत नाही.अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच तुम्हाला जमत नसेल तर राजीनामे व घरी जा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. यावेळी शहराची जबाबदारी असलेल्या दोन कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्याकडून दोघांना सहकार्य केले जात नाही. चांगली उत्तरे दिली जात नाही.त्यामुळे अशा अधिकार्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना द्या अशीही मागणी केली.
भटवाडी,काजरकोंड,उभागुंडा आदी भागात गेल्या काही दिवसापासून बत्ती गुल आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला.यावेळी नागरिकांचा रोष लक्षात घेता.श्री. कुलकर्णी यांनी काही अधिकाऱ्यांना आपण कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. कारवाई करण्याची इशारा दिला आहे असे सांगितले. शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र समस्या निर्माण होत आहेत. असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू,संजय पेडणेकर अमित परब,इफ्तिकार राजगुरू आदी पदाधिकारी उपस्थित होते.