प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्त वार्‍यावर…

143
2
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकर: १३ऑगस्टला मालवणात उपोषण…

कणकवली.ता,८: जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात महापुरामुळे हाहाकार उडाला. याबाबत तातडीने उपाययोजना करायच्या सोडून जिल्हा प्रशासन निद्रिस्त राहिले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ सावंतवाडी मतदारसंघापुरताच दौरा केला. पालकमंत्र्यांसह खासदार आणि आमदार देखील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी मालवण तहसील कार्यालयासमोर १३ ऑगस्टला मनसे पदाधिकार्‍यांसह उपोषण करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. श्री.उपरकर म्हणाले, महापुराचा किनारपट्टीलाही तडाखा बसला. देवबाग आणि तळाशील दुभंगण्याची वेळ आली. काळसे बागमळा येथील अनेक घरे पाण्याने वेढली गेली. तशीच परिस्थिती तिलारी, खारेपाटण, कुडाळ, बांदा, काळसे, मसुरे, कालावल आदी गावांमध्ये झाली. घरे दुकानांमध्ये पुराचे पाणी जाऊन लाखोंची नुकसानी झाली. या सर्व पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांनी दौरा करणे आवश्यक होते. पण ते सावंतवाडी मतदारसंघापुरतेच मर्यादीत राहिले. उर्वरित तालुक्यातील पूरग्रस्तांना त्यांनी वार्‍यावर सोडले आहे.
श्री.उपरकर म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या चुकीच्या कामाचाही फटका नागरिक, वाहन चालकांना सोसावा लागला आहे. महामार्ग दुतर्फा पावसाचे पाणी निचरा होण्याची काळजी हायवे प्रशासन आणि ठेकेदाराने घेतली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग ठप्प झाला. तसेच महामार्गालगतच्या दरडी व्ही आकारात न कापता, सरळ काटकोनात कटाई करण्यात आल्या. त्यामुळे कसाल व इतर ठिकाणी झाडांसह दरडी महामार्गावर आल्या. हा धोका यापुढे देखील असणार आहे.
सिंधुदुर्गात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात महापुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी करणे आवश्यक होते. पण ही मंडळी कुठेच फिरकलेली नाहीत. सर्वकाही आलबेल असल्याप्रमाणे कार्यालयात बसून आहेत. त्याच प्रमाणे स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री देखील पूरग्रस्तांकडे गेले नाहीत. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला देखील जागे केलेले नाही. पूरस्थितीमधून स्थानिकांनाच मार्ग शोधावा लागला आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून आम्ही १३ ऑगस्टला मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत असे श्री.उपरकर म्हणाले.