जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात…

183
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,८: जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून निर्माण झालेली पूर परिस्थिती नियंत्रमात आहे. दोडामार्ग तालुक्यात धरणाचे पाणी नदी पात्रात आल्याने नदीला पूर आला आहे. या ठिकाणी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक बचाव दल मदतकार्य करत आहेत. घोटगेवाडी येथील १४ व्यक्तींना, घोडगे येळपईवाडी येथील ९ व्यक्तींना मणेरी येथील ६ व्यक्तींना, कुडासे येथील ५ लोकांना आणि साटेली येथील ३ व्यक्तीना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. कोनाळकट्टा येथे ३५ कुटुबांतील १५० लोकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर झोळंब येथे दडर कोसळली असून १५ ते २२ कुटुबांतील ६० ते ६५ ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.

कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथे रस्त्याला भेगा पडल्या असून डोंगरावरील माती खाली येत आहे. चेंदवण व सरंबळ येथे नदीला पूर आला आहे. चेंदवण येथील २५ व्यक्तींना स्थलांतरीत केले असून सरंबळ गावातील ४८ व्यक्तींना बोटीतून बाहेर काढून त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे पोहचवण्यात आले आहे. वेंगुर्ला येथे सागरेश्वर मंदीर नजीक ओढ्याचे पाणी आल्याने एकाच कुटुंबातील ८ ते ९ व्यक्तींना तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे. खारेपाटण बाजारपेठ जैनवाडी येथील पाण्यात अडकलेल्या ५ व्यक्तींना सुरक्षीत स्थळी हलविलेले आहे. वैभववाडा तालुक्यात दिगशी येथे नदीला पूर आल्याने संतोष सावंत यांच्या घराभोवती पाणी भरल्याने तीन व्यक्ती आडकल्या होत्या. त्यांना सुरक्षीत स्थळी हवलिण्यात आले आहे. तर मालवण येथे मळा येथे भरतीमुळे ५ कुटुंबातील २० व्यक्तींना तसेच २५ गुरांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. बागवाडी येथील २ कुटुबांतील ६ व्यक्ती आणि ८ गुरे तर देवली येथील ४ कुटुंबातील १२ व्यक्तींना तसेच १८ गुरांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

तिलारी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

तिलारी अंतरराज्य प्रकल्प ९६.१९ टक्के भरला असल्यामुळे या धरणातून सध्या १२८९ घ.मी. प्रतिसेकंद अर्थात सुमारे ३६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २८२.२० मि.मी पावासचा नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ४१३१.४० मि.मी. पाऊस झाला आहे. या धरणातून पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या गावातील ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर मणेरी पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. तिराली नगरीतील ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. २१ जणांचे एन.डी.आर.एफचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८ बोटी तैनात केल्या आहेत.

देवघर मध्यम प्रकल्प ८४.८० टक्के भरला असून या धरणातून सध्या ५७.५९ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १०८.२५ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कणकवली -१०३, कुडाळ १३१, वैभववाडी ८०, देवगड २५, दोडामार्ग १०४, सा. वाडी १८०, मालवण ७२, वेंगुर्ला १७१ पाऊस झाला आहे.

\