खंडित वीज पुरवठ्याप्रश्नी पत्रकारांनी दिली महावितरणला धडक…

199
2
Google search engine
Google search engine

राजकारण्यांच्या हतबलतेमुळे पत्रकार समितीने घेतला पुढाकार ; गैरसोय दूर करण्याच्या सूचना…

मालवण.ता.८: मालवण गेले तीन दिवस अंधारात असून सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्यातील अनियमितते विरोधात पत्रकार समितीने आवाज उठवीत आज दुपारी महावितरणच्या येथील कार्यालयात धडक दिली.
जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य विद्याधर केनवडेकर यांच्यासह मनोज चव्हाण, प्रशांत हिंदळेकर, समीर म्हाडगूत, कुणाल मांजरेकर, महेश कदम, अमित खोत, कृष्णा ढोलम, सिद्धेश आचरेकर, मंगेश नलावडे, भूषण मेतर, गणेश गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी खंडित वीज पुरवठ्याबाबत सहाय्यक अभियंता श्रीमती पवार यांच्याशी पत्रकारांनी चर्चा करत निर्माण झालेल्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. गेले तीन दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांची, गृहिणींचे हाल झाले आहेत. व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. एवढी गंभीर समस्या असताना राजकारण्यांना त्याचे सोयरसुतक नसल्यानेच आज पत्रकार समितीला पुढाकार घ्यावा लागला आहे असे स्पष्ट करण्यात आले.
मालवणला वीज पुरवठा करणाऱ्या कुडाळ आणि विरण दोन्ही लाईन मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी सध्या लाईनवर असून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळ पर्यंत वीज पुरवठा पूर्ववत होईल असे श्रीमती पवार यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अनेक समस्या भासत आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील कट्टा, चौके, तारकर्ली, देवबाग, वायरी, कांदळगाव या मार्गावर कमी दाबाचे व उच्च दाबाचे विद्युत खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. कुडाळ येथे खांब उभारण्याचे काम काल रात्री पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुख्य वाहिनीवर आज मोठे झाड पडल्याने वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तो पूर्ववत होईल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज पुरवठ्यातील बिघाड तत्काळ दूर करून वीज ग्राहकांची गैरसोय त्वरित दूर करण्याचा प्रयत्न करा अशा सूचना पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आली.