कणकवली तालुक्यात विजेचा लपंडाव

2

महावितरणला घेराव : कलमठ, वरवडे, हरकुळबुद्रुक ग्रामस्थ आक्रमक

कणकवली,ता.८: गेले चार दिवस सातत्याने कणकवली तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होत आहे. मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत वीज पुरवठा बंद केला जातो. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाहीत. त्यामुळे वीज पुरवठ्याचा हा खेळखंडोबा संपत नाही तोवर आम्ही कार्यालयातून हलणार नाही. असा इशारा देत हरकुळ ब्रुदूक, वरवडे, कलमठ ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयाला घेराव घातला.
महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी खंडित वीज पुरवठ्याबाबतच्या तक्रारी तातडीने निवारण केल्या जात आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये समस्या राहणार नाहीत अशी ग्वाही दिली. यानंतर ग्रामस्थांनी घेराव मागे घेतला.
तालुक्यातील विविध गावातून आलेल्या ग्रामस्थांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना घेराव घातला. यावेळी पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री, कलमठ माजी सरपंच निसार शेख, आनंद घाडीगावकर, काना मालंडकर, संतोष चव्हाण, हरकुळ बुद्रूक येथील माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, सी.एन.परब, नित्यानंद चिंदरकर, गणेश गावकर, भूषण वाडेकर, पांडुरंग नारकर आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
कलमठ-मुस्लीमवाडी, वरवडे-देसाईवाडी व दोन्ही गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वायरमन फोन उचलत नाहीत. काम केव्हा करणार? कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक केव्हा करणार? चार-चार दिवस अंधारात लोक राहत आहेत. या वायरमनची आमच्या गावातून बदली करा,त्याठिकाणी नवीन वायरमनची नेमणूक करा, अशी मागणी संदीप मेस्त्री, निसार शेख व ग्रामस्थांनी केली. त्यावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. भगत याला घटनास्थळी पाठवून तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर हरकुळ बुद्रुकच्या ग्रामस्थांनी श्री. गवळी यांना धारेवर धरत २०१७ पासून आम्ही पत्रव्यवहार करतो? आम्हाला वायरमन नाही? चार दिवस लाइट नाही? आम्ही करायचे काय? कंत्राटी वायरमन ५ नंतर काम करायला तयार नाहीत? या विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. शिवणे फोन उचलत नाही? त्यामुळे जोपर्यंत वीज पुरवठ्याचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बिल वसुली करायची नाही, रीडिंग घ्यायचे नाही, असा इशारा राजू पेडणेकर यांनी दिला.
आम्हाला कायमस्वरुपी वायरमन द्या. जोपर्यंत वायरमन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका बुलंद पटेल यांनी मांडली. त्यावर कार्यकारी अभियंता गवळी यांनी नवीन २ वायरमन देवू, आजच्या आज विजेचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर तालुक्यातील ग्रामस्थांनी घातलेला घेराव मागे घेतला.

2

4