जिल्ह्यातील ८०४ कुटुंबांना केले स्थलांतरित प्रशासन म्हणतेय पुर नियंत्रणात
सिंधुदुर्गनगरी.ता,८: गेले चार धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी सिंधुदुर्गात काही प्रमाणात उसंत घेतली असली तरी अर्धा जिल्हा अद्याप पुराच्या वेढ्यात अडकला आहे. यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यांचा समावेश असून येथील तब्बल ८०४ कुटुंबांना पुर नियंत्रक पथक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील पुर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात ४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस सुरु झाला. या पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला होता. खारेपाटण, बांदा, कुडाळ, काळसे, तिलारी आदी भागात पुराच्या पाण्याने कहर केल्याने तेथील नागरिकांची व प्रशासनाची पळापळ झाली. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांना पुराग्रस्त भागात तातडीने दौरा लावावा लागला. स्थानिक आमदार सुद्धा आपल्या मतदार संघात तळ ठोकुन आहेत. परंतु जिल्ह्याच्या प्रशासन प्रमुखांकडून कोणत्याही पुरग्रस्त ठिकाणी भेटी दिल्याचे अजुन आढळून आलेले नाही.
गुरुवारी पुराच्या पाण्याचा धोका असल्याने ८०४ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा आपत्ती निवारण विभागातून पुरस्थितीचा आढावा घेतला असता जिल्हयातील विशेषत दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातील ८०४ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी, चांभारवाडी, घोटगेवाडी(भटवाडी), घोटगे येळपईवाडी, मणेरी, मणेरी बडमेवाडी, तळेवाडी, कुडासे वानोशीवाडी, साटेली, कोनाळ ठाकरवाडी, तिराळीवाडी, कोनाळकट्टा, घोटगे वायंगणतड, झोळबे दाबटेवाडी येथील ४४९ कुटुंबांचे गुरुवारी स्थलांतर करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी येथील १०० कुटुंबाना जमिनीला भेगा पडल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. वेंगुर्ला तालुक्यातील सागरेश्वर, सिद्धार्थवाडी, चिपीवाडी, होडावडा बाजारपेठ, होडावडा, कवडासवाडी येथील ३८ कुटुंबाना संरक्षीत ठिकाणी नेण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेडकर नगर, गुलमोहर हाॅटेल, लक्ष्मीवाडी, कवीलकाटे, चेंदवण मळेवाडी, सरंबळ नाईकवाडी, पावशी शेलटेवाडी, बाव बागवाडी, पिंगुळी गुढीपूर येथील २१७ कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले आहे.