३२ कुटुंबांना स्थलांतरिततेच्या नोटिसा : पावसाचा जोर मंदावला, नुकसानीचा आकडा वाढताच
वेंगुर्ले, ता.८ :तालुक्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील काही घरांना धोका निर्माण झाल्यामुळे तुळस, केळुस येथील ७ कुटुंबातील २१ नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांत रित करण्यात आले आहे. तर मातोंड येथील एका कुटुंबाला व तुळस येथील एकूण सुमारे ३२ कुटुंबाना स्थलांतराच्या नोटीसी देण्यात आल्या आहेत.
गेल्या चार दिवसांत तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गेल्या २४ तासात सुमारे २ लाख ६ हजारांच्या नुकसानीची नोंद झाली आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाने काही प्रमाणात विश्राती घेतल्याने पुराच्या पाण्याच्या पातळीत घट होऊन तालुक्यातील वाहतूक सुरळीत झाली होती.
वेंगुर्ला तालुक्यात सलग चार दिवस वादळी वा-यांसह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक लोकांच्या घराच्या भिती पडून लोक बेघर झाले आहेत. मोठ्या प्रमाणात झाडे पडून गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील बहुतांश ठिकाणी विज पुरवठा खंडीत असून नागरीकांचे हाल झाले आहेत. तर वीज वितरण कडून वीज पुरावठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच पाण्याच्या प्रवाहाने माती, दगड आल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी तालुक्यात घरावर झाडे पडून, घरची भिंती कोसळून, घरात पाणी जाऊन तसेच दरडी कोसळून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तुळस काजरमळी येथील भारती भरत सावंत यांच्या सहित घरातील दोन व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने या कुटुंबाला निळकंठ महादेव सावंत यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले. तर पलतड येथील ४ कुटुंबातील १६ व्यक्तींना अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित केले. केळुस येथील शंकर आजगावकर यांना जवळच्या नातेवाईकांकडे तर यशवंत आजगावकर व तुकाराम आजगावकर यांना ग्रामपंचायत सभागृहात स्थलांतरीत करण्यात आले. तसेच गेल्या २४ तासातील पावसामुळे होडावडा आरोग्य उपकेंद्राचे १ लाख ११ हजारांचे नुकसान झाले. तर होडावडा येथील श्वेता काशीनाथ वालावलकर यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून ४२ हजार, बस्तीयाज झाकीर फर्नांडिस यांच्या घराची भिंत कोसळून १६ हजारांचे, वजराठ येथील चंद्रकांत धुरी यांच्या घराची भिंत कोसळून १५ हजारांचे, उदय वेंगुर्लेकर यांच्या घरावर कोकमचे झाड पडून २२ हजारांचे असे मिळून एकूण २ लाखांचे नुकसान झाले.
दरम्यान तालुक्यात तुळस व केळुस येथील एकूण ७ कुटुंबातील २१ कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले तर मातोंड तुळस सहित इतर काही गावातील कुटुंबाना स्थलांतरणाच्या नोटीसी देण्यात आल्या आहेत. आज सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात १७१.२ मी.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण ३,२६९ मी.मी. पाऊस झाला आहे. तुळस-काजरमळी येथे वा-यापावसाचा फटका बसला असून पावसादरम्यान विज कोसळून येथील विकास सावंत यांच्या माडबागायतीचे नुकसान झाले आहे. भारती सावंत यांची विहिरी मातीच्या ढिगा-याखाली जाऊन नुकसान झाले. नारळाची ४० झाडे तसेच आंब्यांच्या झाडांसह कोकमची झाडे पडून नुकसान झाले आहे. पंचायत समिती सदस्य यशवंत परब, तुळस सरपंच शंकर घारे, संतोष शेटकर, तहसिलदार, बिडीओ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली. तर तुळस पलतड परबवाडा येथील डोंगर खचून रस्ता तुटला आहे. यामुळे पराबवाडा गावाचा संपर्क तुटला असून येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितिची वेंगुर्ला तहसीलदार तसेच अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत पाहणी करण्यात आली असून येथील सुमारे ३२ कुटुंबाना स्थलांतरणाच्या नोटीसा तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आल्या आहेत. तुळस-पलतड-नाईकवाडी येथील सखाराम परब यांच्या घराजवळ झाड पडून नुकसान झाले आहे.