काळसेतील पूरस्थिती नियंत्रणात… महसूल प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध ; स्थलांतरित ग्रामस्थ पुन्हा माघारी परतले…

2

मालवण, ता. ८ : पावसाचा जोर ओसरल्याने आज तालुक्यातील काळसे बागवाडी येथील पूरपरिस्थिती नियंत्रणात आली. ज्या ग्रामस्थांनी स्थलांतर केले होते. ते सर्व ग्रामस्थ आपल्या जनावरांसह माघारी परतले. पूर काहीसा ओसरला असला तरी अद्यापही काही घरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे.
दरम्यान आज महसूल प्रशासनाच्यावतीने काळसे बागवाडीतील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
गेले काही दिवस सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने आज विश्रांती घेतली. त्यामुळे सकाळपासून पुराचे पाणी ओसरण्यास मदत मिळाली. काळसे बागवाडी पूराच्या पाण्याने वेढली गेली होती. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. आज तहसीलदार अजय पाटणे यांनी पुन्हा काळसे बागवाडीस भेट देत पूरस्थितीची पाहणी केली.
दुपारी ग्रामस्थांना महसूल प्रशासनाच्यावतीने शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी काळसे सरपंच केशव सावंत, ग्रामसेवक पी. आर. निकम, तलाठी जी. आर. परब, आरोग्यसेवक जी. एस. जाधव, पोलिस पाटील विनायक प्रभू, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश काळसेकर, कोतवाल प्रसाद चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पावसाने विश्रांती घेतल्याने पूराचे पाणी काही प्रमाणात ओसरले आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती सरपंच केशव सावंत यांनी व्यक्त केली.

11

4