दीपक केसरकर:नुकसान झालेल्या “त्या” कुटुंबांचे निश्चितच पुनर्वसन करू
आंबोली. ता,०९: शिरशिंगे येथे डोंगर कोसळून नुकसान झालेल्या घरातील कुंटूबांचे निश्चितच पुनर्वसन करण्यात येईल.तत्पूर्वी त्यांना मदत कार्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,आवश्यक असल्यास बाधीतांना घरे बांधून देऊ अशी हमी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान शिरशिंगे,असनिये,झोळंबे माडखोल आदी ज्या ठिकाणी डोंगर खचले आहेत.त्या ठिकाणचे सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मदतीने करण्यात येईल.गरज पडल्यास संरक्षक कठडे बांधून देवू असेही श्री.केसरकर यांनी सांगितले.
श्री.केसरकर यांनी शिरशिंगे येथे झालेल्या घरांच्या नुकसानीची व डोंगरांची पाहणी केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत यावेळी,प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई,तहसीलदार राजाराम म्हात्रे, रुपेश राऊळ,अशोक दळवी मंगेश तळवणेकर,सुरेश शिर्के आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी श्री.केसरकर यांच्याशी संवाद साधला,मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेकांच्या घराचे,शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे.त्यामुळे त्यांना मदत मिळण्यासाठी योग्य ती मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.दरम्यान कोणावर अन्याय होऊ देणार नाही ज्या लोकांचे नुकसान झाले आहे,त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाला दिले आहेत,लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,असेही श्री.केसरकर यांनी सांगितले.