Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या...तर सोळावा दिवस आमचा असेल...

…तर सोळावा दिवस आमचा असेल…

बंद वीज उपकेंद्र प्रश्नी माजी खास. नीलेश राणेंचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा…

मालवण, ता. ९ : वीज उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन तीन महिन्यांपूर्वी आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर एक दिवसही वीजपुरवठा सुरू नाही. गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असून सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. प्रशासन लोकांना मूर्ख बनवीत आहे. त्यामुळे महावितरणला पंधरा दिवसांची मुदत दिली असून या मुदतीत समस्या दूर न केल्यास सोळावा दिवस आमचा असेल असा इशारा स्वाभीमानचे सरचिटणीस तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे दिला.
मालवण दौर्‍यावर आलेल्या माजी खासदार श्री. राणे यांनी क्रांतीदिनानिमित्त कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारकास भेट देत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर यांनी देऊळवाडा येथे महावितरणच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, बाबा परब, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, सभापती सोनाली कोदे, चारुशीला आचरेकर, नगरसेविका ममता वराडकर, मोहन वराडकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, राजू बिडये, लीलाधर पराडकर, मंदार लुडबे, पिंटो कवटकर, सनी कुडाळकर, वैभव गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. राणे यांनी वीज उपकेंद्रास भेट देत पाहणी केली. यावेळी महावितरणचे अधिकारी संजय गवळी, श्री. सिंग यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. वीज उपकेंद्राचे उद्घाटन होऊन तीन महिने झाले तरी ते का सुरू झाले नाही. समस्या होती तर उद्घाटन का केले अशी विचारणा त्यांनी केली. यावर अधिकार्‍यांनी मंत्र्यांच्या आदेशानुसार उद्घाटन झाले. त्यानंतर एक अडथळा आल्याने हे काम झाले नाही. मात्र ते काम लवकरच होईल असे सांगितले. यावर अडथळा आला त्याला मालवणवासिय जबाबदार आहेत का? गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असून व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले ते महावितरण भरून देणार का? असा सवाल केला. येत्या पंधरा दिवसात उपकेंद्राच्या समस्येसह अन्य समस्या दूर झाल्या पाहिजेत अन्यथा सोळावा दिवस आमचा असेल. मग माझ्यावर ३५३ चा गुन्हा दाखल केला तरी चालेल. सोळाव्या दिवशी येथे जे घडेल त्याला महावितरण जबाबदार राहील. त्यामुळे आम्हाला पुन्हा येथे यायला लावू नका असा इशारा श्री. राणे यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणच्या कार्यालयात कर्मचारी नाहीत ही आमची जबाबदारी नाही. कोट्यवधी रुपये शासन खर्च करत आहेत मग ते जातात कुठे? कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकर झाली पाहिजे. अधिकारी, कर्मचारी येथे येत नाही हे कोणाचे अपयश आहे. त्यांचा हिशोब कसा चुकता करायचा ते नंतर ठरविले जाईल. आज सर्वसामान्यांना जी समस्या भासत आहे त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत. शासन, प्रशासन हे एकत्र चालत नाही हे वीज उपकेंद्रावरून दिसून आले आहे. येत्या काळात टप्प्याटप्प्याने हे विषय हाताळले जातील असेही श्री. राणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments