१५ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर छेडणार आंदोलन…
सिंधुदुर्गनगरी.ता,९: सेवाज्येष्ठता डावलून एस आर पी एफ पोलीसांना पदोन्नती दिली गेली तसेच कुटुंब आरोग्य योजना सवलतीबाबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर १९८३ बॅचचे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर १९८३ या कालावधीत जिल्हा पोलीस दलात दाखल झालो. पोलीस सेवेत असताना दहावी पास ते पदवीधर यांना २३५ या वेतन श्रेणीवर व इयत्ता आठवी व नववी पर्यंत शिक्षण असलेल्या कर्मचा-यांना २३० रूपये वेतन श्रेणीवर ठेवून त्याप्रमाणे शासनाच्या आदेशानुसार वेतन निश्चिती झालेली होती. पोलीस काॅन्स्टेबल यांची १२ वर्ष सेवा झाल्यावर त्यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती दिली जात होती. तसेच १२ वर्षानंतर हवालदार पदावर पदोन्नती मिळत होती. असे असताना पोलीस प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवून आमच्यावर अन्याय केला आहे. वरिल वेतनश्रेणी ही १९९६ मध्ये लागू झालेल्या पाचव्या वेतन आयोगानुसार दिली गेली नाही. पदवीधर,१० नापास व त्या खालील पोलीस कर्मचा-यांना एकाच वेतनश्रेणीत बसवून नुकसान केले. तसेच सेवेतील १२ वर्षे पूर्ण झाल्यावर नाईक पदावर नियुक्ती व वेतनवाढ न देता १८ वर्षे पुर्ण झाल्यावर पोलीस नाईक पदोन्नतीच्या फिता लावण्याचा आदेश झाला. मात्र, त्याची आम्हाला वेतनवाढ दिली गेली नाही. पदोन्नती देताना स्थानिक कर्मचा-यांची सेवाजेष्ठता बाजूला ठेवून एस आर पी मधुन बदलून आलेल्या कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलीस कर्मचा-यांना कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. निवृत्ती नंतर मात्र ही योजना बंद होते. परंतु सेवेत असताना एखाद्या पोलीस कर्मचा-यांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच सेवानिवृत्त झाल्यास आरोग्य सेवा बंद करावीत असे असा शासन आदेश नसताना ही योजना बंद करून पोलीस प्रशासन कर्मचा-यांचा छळ करत असल्याचा आरोपही केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय मिळवून दिला जाईल असे कोकण परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक नवल बजाज यांनी सांगितले होते. मात्र आपल्याला न्याय न मिळाल्याने उपोषणाचा मार्ग धरला आहे. या निवेदनावर एन.एन. हरमलकर, यु. जे. आंबेरकर, एस आर भोगले, व्ही.जी.तेली, डि.एस. घाडीगावकर, पी एन भुजबळ यांच्या स्वाक्ष-या आहेत.