मंगेश लोके; वैभववाडी पं. स. सभा
वैभववाडी.ता,९: तालुक्यातील भुईबावडा व करुळ घाटांसाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी येतो. मात्र या दोन्ही घाटात केलेली कामे बोगस असल्याचा आरोप पं. स. सदस्य मंगेश लोके यांनी केला. लोके यांच्या सूरात सूर मिळवित सदस्य अरविंद रावराणे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती हर्षदा हरयाण, सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, पं. स. सदस्य मंगेश लोके, अक्षता डाफळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लोके म्हणाले, दरवर्षी भुईबावडा व करुळ या दोन्ही घाटांसाठी करोडो रुपयांचा निधी येतो. मात्र या निधीचा अपव्यय होत आहे. घाटांकडे सा. बां. चे नियंत्रण नाही आहे. करण्यात येणारी कामे ठेकेदारांसाठी नको. माणसांचे जीव वाचविण्यासाठी करा. दोन्ही घाटात करण्यात आलेली कामे बोगस असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. लोके यांच्या सूरात सूर मिळवित अरविंद रावराणे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.
तालुक्यात सध्या मिनिटा मिनिटाला विजेचा लपंडाव सुरू आहे. ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडी वाढल्याने याचे परिणाम लोकांना भोगावे लागत आहे. उन्हाळ्यात तीन महिने पाण्यासाठी दुष्काळ काढावा लागला. मात्र आता पाऊस पडूनही लाईटीविना पाण्यासाठी दुष्काळ आहे. वीज वितरणच्या या कारभाराबाबत जि. प. सदस्य शारदा कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महिला बालकल्याण विभाग व पशुसंवर्धन विभागाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे. तरी या रस्त्याची डागडुजी करावी. अशी मागणी पशु विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहात केली. यावर सभापती रावराणे यांनी सदरील रस्ता नगरपंचायत हद्दीत असल्याने याबाबत आपण न. पं. शी पत्रव्यवहार करावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.