बीएसएनएल नेटवर्क अभावी ग्राहक अडचणीत; केळुस उपसरपंचांचे निवेदन…
सिंधुदुर्गनगरी.ता,९: केळुस ग्राम पंचायत क्षेत्रात खा विनायक राऊत यांनी उद्घाटन करण्यात आलेला बीएसएनएल टॉवर अद्याप सुरूच झालेला नाही. तसेच नजिकच्या तेंडोली गावात सुरु असलेला बीएसएनएल टॉवर अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शासकीय यंत्रणेला देता आलेली नाही. त्यामुळे किमान तेंडोली येथील तरी टॉवर सुरु करावा. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडावे लागेल, असा इशारा केळुस उपसरपंच कृष्णा खवणेकर यांनी निवेदनाद्वारे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या सावंतवाडी येथील जिल्हा प्रबंधकांना दिला आहे.
या निवेदनात श्री खवणेकर यांनी, २०१८ मध्ये केळुस ग्राम पंचायत क्षेत्रात बीएसएनएल टॉवर उभा करण्यात आला. त्याचे उद्घाटन खा राऊत यांनी केले. मात्र, उद्घाटन झाल्या पासून हा टॉवर बंदच आहे. केळुस गावात अन्य कंपन्यांच्या मोबाईलची रेंज नाही. बीएसएनएल एकच पर्याय आहे. तसेच तेंडोली येथील सुरु असलेला टॉवर अचानक बंद करण्यात आला. परिणामी अलीकडे केळुस गावात चक्रिवादळ झाले. तसेच मुसळधार पाऊस पडत होता. त्यावेळी अनेक घरे पुराने वेढली होती. त्यावेळी मदतीसाठी शासकीय यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता आला नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.