कर विभाग, स्ट्रीटलाईटच्या प्रश्नांबाबत बांधकाम सभापती गणेश कुशे यांचा इशारा…
मालवण,ता.९: नगरपालिकेतील कर विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसोबतच स्त्रीटलाईटच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासन निद्रितावस्थेतच आहे. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने येत्या १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा नगरपालिकेचे बांधकाम सभापती गणेश कुशे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज मुख्याधिकार्यांना दिले.
नगरपालिकेतील कर विभागाचा अनागोंदी कारभार तसेच शहरातील स्ट्रीटलाईटच्या समस्येसंदर्भात नगरपालिकेच्या सभांमध्ये आवाज उठविला. मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे २० जुलैला मुख्याधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर स्मरणपत्र देऊन प्रत्यक्षात भेटही घेतली. परंतु त्याचे पुढे काय झाले याची माहिती प्रशासनाकडून आपल्याला देण्यात आलेली नाही.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्ट्रीटलाईटच्या समस्येकडे नगरपालिकेच्या विद्युत विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. स्ट्रीटलाईटच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य पुरविण्याच्या निविदेव्यतिरिक्त दुरुस्ती करणे, विद्युत पोलवर चढून दिवे बदलणे यासाठी कर्मचार्यांची आवश्यकता आहे. ते कर्मचारी घेण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत निर्देशही दिले आहेत. मात्र त्याची कार्यवाही प्रशासनाने केली नाही. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी १५ ऑगस्टला नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा श्री. कुशे यांनी दिला आहे.