वेंगुर्ले.ता,९: आयुष्यमान प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ सर्व गरजूंना मिळत नसून दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची नावे यादीत नमूद नसल्याने या योजनेचा लाभ गरजूंना मिळावा असे निवेदन शिवसेना उभादांडा विभागप्रमुख कार्मिस आल्मेडा यांच्यासह पदाधिकारी यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.
आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री विमा योजना ही शासनाची योजना सर्वसामान्य माणसांसाठी जाहीर केली असून या अंतर्गत साधारणतः १३७१ सर्जरी मोफत होतात. अशी ही योजना असून २०११ साली सर्वेक्षण होऊन लाभार्थींची नावे त्यात आहेत असे शासकीय अधिकारी सांगतात. परंतु वस्तूस्थिती तशी नसून दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची नावे या यादीत नाहीत. ही यादी कोणत्या निकषाद्वारे प्रसारीत केली याची माहिती कोणी अधिकारी सांगत नाहीत. त्यामुळे गोरगरीब या योजनेपासून वंचित राहिले आहेत. सदर सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केले असून सर्वसामान्य लोक या प्रकाराबाबत रोष व्यक्त करीत आहेत. शासनाने फेर सर्वेक्षण करुन ग्रामपंचायत, नगरपालिका स्तरावर ती यादी प्रसिद्ध करावी व गोरगरीब जनतेला योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन उभादांडा विभागप्रमुख कार्मिस आल्मेडा, शिवसेना महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी, प्रणाली बंगे, नगरसेविका सुमन निकम, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, नगरसेवक संदेश निकम, ग्रामपंचायत सदस्य टीना आल्मेडा, श्रद्धा कुडाळकर, दयानंद खर्डे, माजी सभापती सुचिता वजराटकर, मोचेमाड उपसरपंच श्रीकांत घाटे, महिला शहर संघटक मंजूषा आरोलकर, विभाग प्रमुख रश्मी डिचोलकर, शिरोडा उपविभागप्रमुख मयुरी राऊळ यांनी पालकमंत्री केसरकर यांना दिले आहे.