कणकवली.ता,९:आपल्या विविध मागण्यांसाठी कणकवली तालुक्यातील ग्रामसेवकांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास २२ ऑगस्ट पासून राज्यभरात काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या आंदोलनात सिंधुदुर्ग ग्रामसेवक युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वर्दम, जिल्हा सहसचिव मंगेश राणे, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, सचिव दीपक तेंडुलकर, उपाध्यक्ष वैभव धुमाळे, महिला उपाध्यक्षा अर्चना लाड यांच्यासह ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेवकांना प्रवासभत्ता लागू करावा. ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन पंचायत समिती विकास अधिकारी पदाची निर्मिती करावी. २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढविण्यात यावीत. ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर केल्या जाव्यात. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी आदी प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांबाबत आज राज्यभर धरणे आंदोलन झाले. ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २२ऑगस्ट पासून राज्यभर कामबंद आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनचे कार्याध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी दिली.