खारेपाटणमधील पूरग्रस्त भागाचीही पाहणी; गाळ उपसा करण्याची ग्वाही
खारेपाटण.ता,९: जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आज आमदार नीतेश राणे यांनी दिलासा दिला. त्यांच्या माध्यमातून खारेपाटण आणि कणकवली शहरात दूध आणि भाजी पुरवठा करण्यात आला. याबरोबरच श्री.राणे यांनी खारेपाटणच्या पूरग्रस्त भागाची पाहणीही केली. यावेळी त्यांनी सूखनदीपात्रातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.
कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती कायम असल्याने सिंधुदुर्गातील भाजीपाला, फळे, दूध, अंडी, कोंबड्या तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून खारेपाटण बाजारपेठ तसेच कणकवलीतील स्वाभिमान कार्यालयात दूध आणि भाजीपाला वाटप करण्यात आले.
खारेपाटण येथील दौर्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे यांच्यासह रफिक नाईक, सूर्यकांत भालेकर, उज्वला चिके, संदेश धुमाळे, शेखर शिंदे, साधना धुमाळे, मंडळ अधिकारी मंगेश यादव, तलाठी रमाकांत डगरे आदी उपस्थित होते.