Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गनगरी येथील रहिवाशांचे १५ऑगस्ट रोजी उपोषण

सिंधुदुर्गनगरी येथील रहिवाशांचे १५ऑगस्ट रोजी उपोषण

सिंधुदुर्गनगरी.ता,९: सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरिमधील रस्ते, पथदीप आदींच्या दुरुस्ती, तसेच नूतनीकरण करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटार बांधकाम अशा अनेक समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधूनही याबाबतची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय सिंधुदुर्गनगरी नवनगर रहिवासी संघाच्यावतीने घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांना देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीचे शहर म्हणजे सिंधुदुर्गनगरी या सिंधुदुर्गनगरी येथील रस्ते, इमारती दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था आधी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र यावर प्राधिकरण लक्ष देत नाही. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण संघाची नुकतीच संघाचे अध्यक्ष सी आर पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघाचे सचिव विजय राऊळ, सत्यवान राणे, अशोक रासम, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, बि पी चव्हाण, जनार्दन फाले, आदेश नाईक, उल्हास पालव, स्वप्निल वंटे, राजेंद्र राणे, आशा पालव, श्रीमती जुवेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी शहराची निर्मिती होऊन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र या २५ वर्षा नंतरही येथे आवश्यक असलेल्या सेवा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. येथे असलेले रस्ते पंचवीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. मात्र रस्त्यांचे नूतनीकरण न करता दरवर्षी केवळ खड्डे भरून मलमपट्टी केली जाते. त्याचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत या नगरीतील सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. नवनगर प्राधिकरण भागातील सर्व अंतर्गत रस्ते खचले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने सर्व रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राधिकरण क्षेत्रात लावण्यात आलेल्या पथदीपांपैकी काही ठराविकच पथदीप सुरु आहेत. हे सर्व पथदीप सुरू करण्यात यावेत,
प्राधिकरण क्षेत्रांमध्ये आता वस्ती वाढू लागली आहे. दोन-दोन गुंठ्याच्या जागेमध्ये घरे बांधताना सांडपाणी कुठे सोडावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटार योजना राबवावी. तसेच सर्वच रस्त्यांना गटार बांधकाम करण्यात यावे. प्राधिकरण क्षेत्रातील रखडलेले विरंगुळा केंद्राचे काम मार्गी लावावे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्ण करावा तसेच त्याठिकाणी लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. जिजामाता बस स्टॉप येथे लांब पल्ल्याच्या सर्वच एसटी बस थांबविण्यात याव्यात.
प्राधिकरण क्षेत्रातील सर्व रहिवाशांना ९९ वर्षाच्या करारावर भूखंड दिले आहेत. त्यांना प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्यात यावे. प्राधिकरण क्षेत्रातील हवाई विद्युत लाईट भूमिगत करण्यात यावी. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने प्राधिकरणसाठी स्वतंत्रपणे लाईनमन देण्यात यावा. पाणीपुरवठ्याचे दर भरमसाठ वाढविण्यात आले आहेत. ते कमी करण्यात यावेत अशा विविध मागण्यांवर सभेमध्ये चर्चा झाली व या मागण्याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments