काळसे बागवाडीतील पूरग्रस्तांना नीलेश राणेंकडून मिनरल वॉटरचे वाटप… पाण्याची समस्या सुटेपर्यंत पाणी उपलब्ध करून देणार ; राणेंनी दिली ग्रामस्थांना ग्वाही…

165
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ९ : तालुक्यातील पूरग्रस्त काळसे बागवाडीला माजी खासदार नीलेश राणे यांनी भेट दिली असता स्थानिक ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार आज श्री. राणे यांनी काळसे बागवाडीत जात ग्रामस्थांना मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले. पाणी प्रश्न मिटेपर्यंत ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ असे राणेंनी यावेळी स्पष्ट केले.
कर्ली नदीला पूर आल्याने काळसे बागवाडी मध्ये पुराचे पाणी घुसले होते. दोन दिवस गावात ७ ते ८ फूट पाणी असल्याने तेथील विहिरींचे पाणी दूषित झाले. आता पाणी ओसरल्याने ग्रामस्थ पुन्हा एकदा गावात परतले आहेत. मात्र आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. काल सायंकाळी माजी खासदार नीलेश राणे यांनी काळसे मधील सातेरी मंदिरात ग्रामस्थांची भेट घेतली होती. यावेळी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निदर्शनास आणून दिला होता. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेऊन आज राणेंनी बागवाडीला भेट दिली. सुरवातीस काळसे ग्रामसचिवालयात जाऊन सरपंच केशव सावंत आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी काळसे बागवाडीमध्ये जाऊन ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सचे वाटप केले. हे बॉक्स संपल्यानंतर पाणी प्रश्न लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणखी पाणी दिले जाईल, असे सांगितले.
यावेळी सरपंच केशव सावंत यांनी नीलेश राणे यांचे आभार मानत याठिकाणी पूरपरिस्थितीचा विचार करून होडी, लाईफ जॅकेट शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी केली. तर रॉकेलच्या तुटवड्याकडे ग्रामस्थांनी त्यांचे लक्ष वेधले. ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या सर्व बाबींची लेखी माहिती ग्रामसेवकानी तयार करून आपल्याकडे द्यावी, त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राणेंनी दिली.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, राजू बिडये, लीलाधर पराडकर, दीपक पाटकर यांच्यासह उपसरपंच उल्हास नार्वेकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, अनुष्का हेरेकर, व्ही. के. जाधव, रमाकांत परब, विजय कोळगे, ग्रामसेवक पी. आर. निकम तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.