स्थलांतर करावे की, न करावे….घारपी ग्रामस्थांसमोर पेच

417
2

प्रशासनाने आदेश दिले,मात्र सुविधा नसल्यामुळे आपद्ग्रस्तांना घरातच राहण्याचा निर्णय

ओटवणे:
असनिये कणेवाडी येथील 18 घरांतील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतर करण्याचे निर्देश दिले खरे,मात्र ज्या ठिकाणी ग्रामस्थांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली तेथे कोणतीच सुविधा नसल्याने स्थलांतर करावे की नको,असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.मोठी नैसर्गिक विपदा समोर असतानाही कोणत्याही सुविधा नसणाऱ्या जागेत स्थलांतर करण्यापेक्षा गड्या आपले घरच बरे,अशी भूमिका घेत ग्रामस्थ अजूनही भीतीच्या छायेखाली कणेवाडी येथेच थांबले आहेत.
असनिये येथे कोसळणाऱ्या दरडींचा धोका पाहता,कणेवाडी येथील 18 घरांतील ग्रामस्थांनी अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.असनिये प्राथमिक शाळा येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र पर्यायी व्यवस्था केलेल्या ठिकाणी ना अन्न, ना,पाणी ना वीज,अश्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत.त्यामुळे अश्या जागेत लहान मुले,वृध्द यांच्यासह कसे काय जाऊन रहावे, असा प्रश्न ग्रामस्थांच्या समोर निर्माण झाला आहे.
प्रशासनाने घाईगडबडीत स्थलांतर करण्याचे निर्देश दिलेत,असा ग्रामस्थांचा आरोप आहे.कणेवाडी येथे धोका आहे,मात्र लहान मुले,वृद्ध यांची होणारी असुविधा पाहता ग्रामस्थांनी भीतीच्या छायेखाली धोकादायक दरडींच्या शेजारीच रात्र काढण्याचा निर्णय घेतला आहे. गावात 8 दिवस वीज नाही,परगावी पाहुण्यांकडे जावे तर एस. टी. सेवा बंद,खासगी वाहनांनी जायचे म्हटल्यास रस्त्यावर दरड अश्या विचित्र स्थितीत येथील ग्रामस्थ अडकले आहेत.

4