बांदा शहरातील पुराचे पाणी ओसरले,मात्र परिसरात दुर्गंधी…

183
2

चिखल,कचऱ्याचे साम्राज्य;नुकसानीचे दुःख बाजुला ठेवून व्यापारी पुन्हा सज्ज…

बांदा ता.१०: शहरातील पुराचे पाणी ओसरल्यावर बाजारपेठेत चिखल व कचऱ्याच्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.पुराच्या पाण्याने संपूर्ण बाजारपेठेत होत्याचे नव्हते झाले.मात्र नुकसानीची चिंता चेहेऱ्यावर न दाखविता व्यापारी बांधव पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.महसूल प्रशासनाकडून आजपर्यंत १०० हुन अधिक पूर बाधित घरे व १२५ हुन अधिक बाजारपेठेतील दुकानांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून सुमारे तीन कोटी रुपये नुकसानिची नोंद करण्यात आली आहे. पुराचे पाणी विहिरीत गेल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागही सतर्क झाला असून येत्या सोमवार पासून दररोज प्रभाग निहाय आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले.
बांदा शहरातील पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नुकसानीचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता महसूल प्रशासनाने व्यक्त केली आहे. व्यापारी दुकाने सफसफाईच्या कामात गुंतल्याने अद्यापही काही पंचनामे शिल्लक आहेत. बांदा शहर हे ग्रामीण भागात येत असल्याने शासकीय नुकसान भरपाईच्या निकषानुसार पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. पुरबधित व्यापारी व ग्रामस्थांना सरपंच मंदार कल्याणकर यांनी चहा, बिस्किटे व पोहे यांचे वाटप केले. जात-पात, पक्षभेद विसरून सर्वच बांदावासीय एकजुटीने मदतीसाठी सरसावल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
पावसाच्या रुद्रावताराने बांदा शहरात अक्षरशः थैमान घातले. तब्बल तीन दिवस बांदा बाजारपेठ पाण्याखाली होती.  पूर ओसरल्यावर आळवाडी, कट्टा कॉर्नर, गांधीचौक, उभाबाजार बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिखल व कचरा साचला आहे. घरात व दुकानात पाणी शिरल्याने कित्येकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. येथील स्थिती ही भयावह व विदारक आहे. घरातील मौल्यवान चिजवस्तूंसह मुलांची दप्तरे व शाळेचे सहित्यही वाहून गेल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. किरकोळ व छोट्या विक्रेत्यांचे स्टॉल, दुकानेच वाहून गेल्याने त्यांच्यासमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील भिंतींवर चिखलाचे ठसे उमटले आहेत. आळवाडीतील शेकडो कोंबड्या पाण्यात बुडाल्या आहेत, तर भुसारी दुकानातील कडधान्य पुराच्या पाण्याने रस्त्यावर आले आहे. बांदा तलाठी फिरोज खान यांनी आजपर्यंत आळवाडी, गांधीचौक, उभाबाजार, कट्टा कॉर्नर, आंगडीवाडी, चर्मकारवाडी येथील १०० हुन अधिक घरे व १२५ हुन अधिक दुकानांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यामध्ये सुमारे ३ कोटीहून अधिक नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

4