डी. के.सावंत यांचा आरोप: चौकशी करण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण करणार…
सावंतवाडी ता.१०: नगररचना विभागातील अधिकाऱ्याने बिल्डिंगची परवानगी देण्यासाठी माझ्याकडे तब्बल तीन लाख रुपये मागितले.असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते डि.के. सावंत यांनी केला.जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम आणि नगररचनाकार विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे.आर्कीटेक्ट लोकांना हाताशी धरून हे अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे एंटी करप्शन सारख्या पथकाला ते मिळू शकत नाहीत ही शोकांतिका आहे,असाही आरोप त्यांनी केला.दरम्यान या प्रकाराची चौकशी करण्यासाठी येत्या १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशाराही त्यांनी दिला.
याबाबत लवकर आपण विधानसभेत आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.आपल्या बांदा येथील एका इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी मागितली होती.मात्र एका झोपडीचे कारण पुढे करून त्यांनी ती परवानगी तब्बल दोन वर्षे नाकारली.आपण पैसे देण्यास नकार दिल्यानंतरआर्किटेक्चरच्या माध्यमातून ५० हजार रुपये तरी द्या.असा निरोप पाठवला.त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.याबाबत आवश्यक असलेले पुरावे मी माहितीच्या अधिकारात काढून ठेवले आहेत असेही श्री.सावंत म्हणाले.