फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रयत्नातून ब्रह्मनगरी झाली प्लास्टिकमुक्त…

141
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एनएसएस विभागाच्या कार्याला मिळाले अभूतपूर्व यश…

फोंडाघाट ता.१०: प्लास्टिक सारख्या घातक कचऱ्याला हद्दपार करणे हे सर्वच नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.त्यासाठी जाणीव जागृती निर्माण करण्याचे व प्रत्यक्ष कृती करण्याचे महत्त्वाचे कार्य फोंडाघाट महाविद्यालयातील एनएसएस विभागातील स्वयंसेवकांनी केली असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ब्रम्हनगरी हे गाव प्लास्टिकमुक्त होऊ शकले असे प्रतिपादन फोंडाघाटचे सरपंच संतोष आग्रे यांनी केले.ते स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत ब्रम्हनगरी हे गाव प्लास्टिकमुक्त केल्याचे पत्र महाविद्यालयाला प्रदान करताना बोलत होते.यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत चौलकर एनएसएस विभाग प्रमुख प्रा.डॉ. बालाजी सुरवसे उपस्थित होते.
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालय आणि युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयालयाचे उपक्रमांतर्गत तसेच मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार ब्रम्हनगरी येथे एनएसएस विभागाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने माहिती, शिक्षण आणि संवाद ( IEC ) या प्रकल्पांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण करणे, स्वच्छता विषयक जनजागृती मोहीम राबविणे, पथनाट्य, स्वच्छता मेळावे व प्रदर्शनांचे आयाेजन करणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेविषयी तज्ञांचे मार्गदर्शन, लघुपट व चित्रपट दाखविणे आदींचे आयोजन केले हाेते. तर घनकचरा व्यवस्थापन ( SWM ) या प्रकल्पांतर्गत एनएसएस विभागातील स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन व सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याचे संकलन करुन त्याचे सुमारे १८ प्रकारे वर्गीकरण करुन त्यापासून पुनर्निर्मिती व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हा उपक्रम खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरला. घरोघरी जाऊन घनकचरा व्यवस्थापन तसेच शौचालयाचे वापराविषयी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थानी प्रतिसाद दिला. परिणामी ब्रम्हनगरी हे गाव स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त होण्यास मदत झाली.फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने केलेल्या या कार्याची दखल घेऊन फोंडाघाट ग्रामपंचायतीने तसे महाविद्यालयाला पत्र दिले आहे. फोंडाघाट महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या स्वच्छता विषयक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे सहाय्यक संतोष आखाडे व प्रा. रूपाली माने तसेच एनएसएसचे स्वयंसेवक यांनी खूप परिश्रम घेतले. यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक तसेच प्राचार्य डॉ. वसंत शेकडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.

\