नीतेश राणे:दोन कोटींची मदत हा भीक घालण्याचा प्रकार…
कणकवली, ता.१०: सिंधुदुर्गातील पूरग्रस्तांचे २५ कोटी हून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. मात्र राज्याच्या वित्त व नियोजन खात्याचे मंत्री असलेले दीपक केसरकर अवघी दोन कोटींची मदत पूरग्रस्तांना जाहीर करतात. ही जिल्ह्यातील पूरग्रस्तांची थट्टा आहे. पालकमंत्री पूरग्रस्तांची फसवणूक करीत आहेत असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केला.
येथील प्रहार भवनमध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, फक्त बांदा बाजारपेठेतील व्यापार्यांची पूरामुळे दोन कोटीपेक्षा अधिक हानी झाली आहे. वैभववाडीत तर २०० ते ३०० एकरमधील ऊसशेती उध्वस्थ झाली आहे. याखेरीज सिंधुदुर्गातील शेकडो हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान झाले आहे. याखेरीज खारेपाटण ते दोडामार्ग पर्यंत अनेकांची घरे पूर्णतः उध्वस्थ झालीत. संपूर्ण संसारच पाण्याखाली बुडाला आहे. या सर्वांसाठी अवघी दोन कोटींची मदत जाहीर करून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गवासीयांची थट्टा चालवली आहे.
सिंधुदुर्गातील पूरग्रस्तांना न्याय मिळाला, त्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूनवर्सनमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेणार आहोत. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही श्री.राणे म्हणाले.