नितेश राणे यांची टीका: जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याबाबत कोणतीही उपाययोजना नाही
कणकवली, ता.१०: कुडाळ, खारेपाटण, काळसे बागमळा आदींसह जिल्ह्यातील अनेक घरे आणि त्यातील माणसे पुराने वेढली गेली. पण जिल्हा प्रशासनाची मदत तेथे पोचलीच नाही. स्थानिकांनी पूरस्थितीमधील नागरिकांना बाहेर काढले. जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणेसह आमदार, खासदार, पालकमंत्री पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीत केली. तसेच गेले आठ दिवस सिंधुदुर्गात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाने कोणती उपाययोजना केली असाही प्रश्न श्री.राणे यांनी उपस्थित केला आहे.
आमदार श्री.राणे म्हणाले, सिंधुदुर्गात दूध, अंडी, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा आठ दिवस तुटवडा आहे. त्याबाबत प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक होते. परंतु जिल्हा प्रशासन ढिम्म राहिले तसेच खासदार, पालकमंत्र्यांंनाही याचे गांभीर्य राहिले नाही. पालकमंंत्री प्रत्येक महिन्याला आम्ही हे करणार, ते करणार अशा घोषणा करतात. पण त्यांना पूरस्थिती उद्भवली तर काय करायचे याचेही नियोजन करता आलेले नाही. सिंधुदुर्गात नीतेश राणे कुठे फिरतात याचा शोध घेण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी कुठे कुठे पूरस्थिती आहे आणि तेथे कशी मदत पोचवता येईल याची माहिती घेणे अधिक योग्य ठरले असते.
पूरग्रस्तांचा पंचनाम्यावर विश्वास नाही
नुकसानग्रस्तांचे शासकीय यंत्रणेकडून पंचनामे केले जातात. प्रत्यक्षात मदत मिळत नाही. त्यामुळे पूरग्रस्तांनी पंचनामे करण्यासही नकार दिला आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या पाहणी दौर्यानेही काहीही निष्पन्न होणार नाही हे देखील सिंधुदुर्गवासीयांना विशेषतः कणकवलीकरांना चांगलेच ठाऊक आहे असेही श्री.राणे म्हणाले. कणकवली मतदारसंघात पाच हजार लिटर दूध आणि १० टन भाजीपाल्याचे वितरण केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.