नागरीकांना मिळणार एका खिडकीवर विविध दाखले
वेंगुर्ले : ता.१०: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नागरी सेतू सुविधा केंद्राच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी केले असल्याची माहिती वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.
नागरी सुविधा केंद्रामार्फत शहरातील नागरिकांना नगरपरिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा जसे की पाणीपट्टी, घरपट्टी व विविध प्रकारचे दाखले एका खिडकीवर उपलब्ध होणार आहेत. हे नागरी सुविधा केंद्र वेंगुर्ला नगरपरिषदेच्या तळमजल्यावर उभारण्यात आलेले असून यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व गर्भवती महिला यांना होणारा त्रास कमी होणार आहे. हे सुविधा केंद्र पूर्णपणे अद्ययावत व संगणीकृत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. अशी सुविधा देणारी वेंगुर्ला नगरपरिषद राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरणार आहे. शहरातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने नागरी सुविधा केंद्र उभारुन महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हे सुविधा केंद्र शहराच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वासा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला आहे.