करूळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमने घेतली शोधमोहीम हाती
वैभववाडी. ता,१०: पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या उंबर्डे बौद्धवाडी येथील महेंद्र कदम हा सलग सातव्या दिवशीही सापडून आला नाही. दरम्यान शोधकार्यासाठी करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमला उंबर्डे येथे पाचारण करण्यात आले आहे. तहसिलदार रामदास झळके यांच्या नेतृत्वाखाली या टीमने शोधमोहीम सुरू केली आहे.
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उंबर्डे येथील महेंद्र धकला कदम वय ४३ हा युवक वाहून गेला. गेली चार दिवस तालुक्यातील शासकीय आपत्ती यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. परंतु महेंद्र अध्यापही सापडला नाही. त्याच्या शोध कार्यासाठी तहसिलदार रामदास झळके यांनी सह्याद्री जीव रक्षक करुळ या टिमला पाचारण केले आहे. टीम प्रमुख हेमंत पाटील यांच्या टीम मधील १५ जीव रक्षक उंबर्डे येथील नदीपात्रात महेंद्र याचा शोध घेण्यासाठी उतरले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहीम सुरू रहाणार आहे.