विविध सामाजिक संघटनांची बैठक ः सोमवारी कणकवलीत फेरी
कणकवली, ता.10 ः राज्यासह सिंधुदुर्गातही अतिवृष्टीमुळे अनेक संसार कोलमडले. त्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी कणकवलीकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शहर आणि परिसरातील अनेक संस्था आज एकत्र आल्या. या संस्थांच्या पहिल्याच बैठकी 2 लाख 30 हजाराची रक्कम जमा झाली. ही रक्कम कोनाळकट्टा येथील आपद्ग्रस्तांसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले. याखेरीज सोमवारी (ता.12) कणकवली शहरातून आपद्ग्रस्तांसाठी फेरी काढण्यात येणार आहे. यात जमा होणार्या रक्कमेचा विनियोग जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल येथे शहरातील सामाजिक संघटनांची बैठक झाली. यात आम्ही कणकवलीकर, संवेदना परिवार, रोटरी क्लब कणकवली, बाबासाहेब खाडये फाऊंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, प्रवासी संघटना, वैद्यकीय व्यावसायिक संघटना, पत्रकार संघटना, शेतकरी संघ, ठेकेदार असोसिएशन, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ, श्रीधर नाईक फाऊंडेशन, औषध विक्रेता संघटना, तहसीलदार कणकवली व्यापारी संघ, तलाठी संघ, कणकवली कॉलेज या संस्थांचे पदाधिकारी एकत्र आले होते.
या बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नियोजन करण्यात आले. यावेळी अशोक करंबेळकर, प्रभारी तहसीलदार आर.जे.पवार, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ.सुहास पावसकर, डॉ. नीलेश कोदे, नगरसेवक सुशांत नाईक, विशाल कामत, महेंद्र मुरकर, दादा कुडतरकर, डॉ. संदीप नाटेकर, रूपेश खाडये, सुजित जाधव, संदीप राणे, अॅड. विलास परब, बबलू सावंत, रामदास विखाळे, बाळू मेस्त्री, श्री. घाडीगावकर, तलाठी श्री. पाटील, विशाल डामरी आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान ज्या नागरिकांना, संस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची असेल त्यांनी
डॉ. सुहास पावसकर (9422373533), राजेश राजाध्यक्ष (9421644080), बाळू मेस्त्री (9422633814) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.