दरडीला तडे गेल्याने मंदिरास धोका ; स्थानिक ग्रामस्थांनी वेधले आमदारांचे लक्ष…
मालवण, ता. १० : तालुक्यातील काळसे गोसावीवाडी येथील श्री देव सिद्धमहापुरूष मंदिरानजिक असलेल्या दरडीचा काही भाग रात्री अतिवृष्टीमुळे कोसळला आणि वाटेवर पडून सार्वजनिक विहीरीवर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. अजूनही दरडीला तडे गेले असल्याने दरडीचा मोठा भाग आणि त्यावरील झाडे सिद्धमहापुरूष मंदिरावर कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे कोसळलेला भाग बाजूला करून वाट मोकळी करणे धोक्याचे बनले आहे. परिणामी वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
दरम्यान आमदार वैभव नाईक जनसंवाद यात्रेनिमित्त काळसे गावात आले असताना त्यांना वाडीतील ग्रामस्थांनी निवेदन देउन सिद्धमहापुरूष मंदिराशेजारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी विकासनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.