रस्ता व पायवाटेसाठी निधी केला जाहीर : ग्रामस्थांकडून समाधान
वेंगुर्ले.ता,११: वित्त व ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री दिपक केसरकर यांनी तुळस येथील स्थलांतरित ग्रामस्थांना आज भेट दिल्यावर ग्रामस्थांनी त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी त्यांनी तेथील पर्यायी रस्त्याचा मार्ग करण्यासाठी चार लाख रुपये निधी व पायवाट साठी एक लाख रुपये निधी देत असल्याचे जाहीर केले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या कामा बाबत सूचना केल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
तुळस येथील स्थलांतरित ग्रामस्थांना दीपकभाई केसरकर यांनी आज भेट दिली. या स्थलांतरीतांसाठी यापूर्वी त्यांनी ३० हजार मदत दिली होती आज पुन्हा २० हजार रुपये तात्काळ मदत दिली. त्याच प्रमाणे स्थलांतरीत ग्रामस्थांना अन्नधान्य कमी पडल्यास तात्काळ पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तुळस ग्रामस्थांवर हे मोठे संकट कोसळले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आमच्याकडून जी जी मदत करता येणार आहे ती आम्ही नक्की करणार आहोत. या संकटाला आपण सर्वजण धीराने सामोरे जाऊया असे आवाहन त्यांनी केले. येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने सतर्क राहावे. तसेच येथील स्वच्छता आणि शौचालयाच्या प्रश्नांकडेही प्रशासनाने गांभीर्याने पाहावे अशी सूचना त्यांनी केली. तसेच खचलेल्या रस्त्याचे भुगर्भ तज्ञांना माती परीक्षण करून संध्याकाळ पर्यंत रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.त्यामुळे याचा अहवाल येई पर्यंत धोका लक्ष्यात घेऊन ग्रामस्थांनी मूळ घरी जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख यशवंत परब, प.स.सभापती सुनील मोरजकर, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, उपनागराध्यक्ष अस्मिता राऊळ, उपतालुका प्रमुख संजय गावडे, पंकज शिरसाट, नितीन मांजरेकर, विवेक आरोलकर, सुनील डुबळे, विविध खात्याचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तुळस नंतर केसरकर यांनी वेंगुर्ला तालुक्यात आपत्तीग्रस्थ ठिकाणी भेटी दिल्या.