मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने चौकशी सुरू
वेंगुर्ले.ता,११: रेडी येथील जांभळी ते अमित सूर्याजी घरापर्यंत पायवाट सिमेंटीकरण कामामध्ये अनियमितता असून त्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक जलसंधारण अधिकारी विनोद रुद्रे यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी व मोजमाप घेऊन चौकशी केली.
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामपंचायत येथील सन २०१६-१७ या वर्षातील जांभळी ते अमित सूर्याजी घरापर्यंत पायवाट सिमेंटीकरण या कामामध्ये अनियमितता असून त्यात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सिईओ राजन रेडकर यांनी केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीम. के. मंजुलक्ष्मी, यांनी सदर कामाची गोपनीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक जलसंधारण अधिकारी विनोद रुद्रे यांचेकडे ही चौकशी देण्यात आली. त्यांनी तक्रारदार रेडकर यांना बरोबर घेऊन घटनास्थळाची पाहणी करत रस्त्याची मोजमाप घेतली. या वेळी त्यांच्या सोबत
उप विभागीय जलसंधारण अधिकारी एस. एम. आदणावार, जि. प. बांधकाम विभागाचे उप अभियंता जे. डी. कांबळी, रेडी उपसरपंच श्रीम.सायली पोखरणकर रेडी, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद इंगळे, सेवानिवृत्ती क. अभि.(बांध) एस. एन. जोईल, शाखा अभियंता(बांध) प्रीतम पवार आदि उपस्थित होते.
जांभळी ते अमित सूर्याजी या पायवाटीचे समक्ष मोजमाप केले असता ७३ मीटर पैकी २८ मीटर सिमेंटीकरण काम झालेले आहे. उर्वरित कामाचे सिमेंटीकरण झालेले नाही. या कामाचे ठेकेदार कुडव यांना कामाच्या देयकाची रक्कम रु. १३६००५/- ही काम अपूर्ण असतानाही ते पूर्ण झालेले आहे असे भासवून, दिशाभूल करून अदा करण्यात आली. या कामामध्ये गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार पुराव्यासह अर्जदार राजन रेडकर यांनी केली. याबाबत रेडी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदार राजन रेडकर यांचा तसेच संबंधितांचे जबाब घेण्यात आले. यावेळी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था सिंधूदुर्ग विभागाचे पदाधिकारी जगन्नाथ राणे, दयानंद कृष्णाजी, रविंद्र राणे, सौरभ नागोळकर, मुरलीधर राऊळ, विशाल चिपकर व प्रविण नागोळकर यांनी चौकशी अधिकारी विनोद रुद्रे यांना सदर गंभीर चौकशी निःपक्षपातीपणे होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.