१५ ऑगस्टला प. स. कार्यालयासमोर उपोषणाचा वसंत मोंडकर यांचा इशारा…
मालवण, ता. ११ : तारकर्ली ग्रामपंचायती मधील आकृती बंधातील दिवाबत्ती कामगार पदी रुजू करून घेण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करत असून आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात १५ ऑगस्टला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वसंत मोंडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वसंत मोंडकर हे यापूर्वी तारकर्ली ग्रामपंचायतीत दिवाबत्ती कामगार म्हणून कार्यरत होते. मोंडकर हे एका पायाने अपंग असल्याने पायाच्या सततच्या दुखण्यामुळे व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी राजीनामा दिला होता. मात्र घराची परिस्थिती गरीब असल्यामुळे ४ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांनी हा राजीनामा मागे घेण्याचा माफीनामा व त्यासोबत घेतलेल्या वैद्यकीय उपचाराचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र त्यांना पुन्हा कामावर हजर करून घेण्याबाबत तारकर्ली ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याविषयी त्यांनी विचारणा केली असता गटविकास अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे असे ग्रामपंचायतीकडून लेखी सांगण्यात आले. पुन्हा चौकशी केली असता कोकण आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविले आहे असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
वरिष्ठांकडून ग्रामपंचायतीला काही मार्गदर्शन प्राप्त झाले की नाही किंवा वरिष्ठांचे मार्गदर्शन तारकर्ली सरपंचांना मान्य नाही. याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे मोंडकर यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत दाखल केलेल्या अपिलावर कोणतेही लेखी उत्तर मिळालेले नाही. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी यांनीही आपल्याला कोणताही न्याय दिलेला नाही, अधिकारी हे तारकर्ली सरपंचांना घाबरून काम करतात का ? आपणास कामावर रुजू करण्यास सरपंच टाळाटाळ का करत आहेत असे प्रश्न मोंडकर यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केले आहेत. याबाबत आपण १५ रोजी उपोषण करणार असून आपणास न्याय मिळावा अशी अपेक्षा मोंडकर यांनी व्यक्त केली आहे.