विनायक राऊत: रस्ता कमकुवत होण्यास मोबाईल कंपन्याच जबाबदार
सावंतवाडी ता.१२ : आंबोली घाटात चुकीच्या पद्धतीने मोबाईल केबलसाठी खोदाई करण्यात आल्यामुळे घाट कोसळण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. रस्ता कमकुवत होण्यास मोबाईल कंपन्याच जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
श्री राऊत यांनी काल सायंकाळी उशिरा सरमळे,झोळंबे आदी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले आंबोली घाटात चुकीच्या पद्धतीने खोदाई करण्यात आली आहे.त्यामुळे अनेक वर्षापासून सुरक्षित असलेला घाट आता धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या बाजूला खोदाई झाल्यामुळे तेथील संरक्षक कठडे कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे या प्रकाराला नेमके जबाबदार कोण त्याची माहिती घेण्यात येणार आहे.
-ते पुढे म्हणाले सरमळे येथील मुख्य रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी लोकांची मागणी आहे. परंतु नदीच्या पात्राला लागून रस्ता असल्यामुळे काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.मात्र गणेश चतुर्थी पूर्वी योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. डोंगरांचे भूस्खलन झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांना आवश्यक असलेल्या सेवा देण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.