वैभववाडी ते कोल्हापुर रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी

222
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रेल्वेमंत्र्यांनी केले ट्वीट:अतुल काळसेकर यांनी दिली माहीती

कणकवली, ता.१२: रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच ट्विटद्वारे वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की सरकारने वैभववाडी पासून कोल्हापूर पर्यंत नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी अनुमती दिलेली आहे. ही नवी रेल्वेलाईन कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या औद्योगिक क्षेत्रांसाठी वरदान सिद्ध होईल. आर्थिक प्रगती, रोजगारनिर्मिती या सोबत सुलभ मालवाहतूक, विद्युतनिर्मिती, कोळसा वाहतूक इत्यादीसाठी हा मार्ग महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी आज दिली.

श्री.काळसेकर म्हणाले, तळकोकणच्या विकासाचे एक नवे पर्व सुरु होणार याचे संकेत देणारे हे शब्द आहेत. त्यासाठी रेल्वेमंत्री माननीय पियुषजी गोयल यांच्यासह या नव्या विकास पर्वाचे शिल्पकार म्हणून भाजपा नेते माननीय प्रमोदजी जठार आणि तत्कालीन रेल्वेमंत्री माननीय सुरेशजी प्रभू यांचेही समस्त कोकणवासीयांच्या वतीने आम्ही अभिनंदन करत आहोत.

या नव्या रेल्वेलाईनसाठी पहिल्यापासून मा. प्रमोदजी जठार यांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतली होती. त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री मा. सुरेशजी प्रभू यांच्याकडे मागणी केली होती की वैभववाडी हे कोल्हापूरशी जोडले पाहिजे आणि पुढे वैभववाडी ते विजयदुर्ग अशी रेल्वेलाईन झाली पाहिजे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मा. सुरेशजी प्रभूंच्या प्रयत्नाना आज यश प्राप्त झाले आहे. कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

आपल्या कोकणचा विकास वेगाने होण्यासाठी नवी अत्याधुनिक बंदरे विकसित व्हायला हवी. पण अशा बंदरांचा विकास व्हायचा असेल तर त्या बंदरांनादेखील मोठा धंदा मिळाला पाहिजे. आताची अडचण अशी आहे की इथे मोठे निर्यातक्षम प्रकल्प नाहीत.कच्चा माल आयात होण्यासाठीही असे प्रक्रिया प्रकल्प लागतातच. त्याचप्रमाणे बंदरांना व्यवसाय मिळाला पाहीजे तर ती बंदरे रेल्वेमार्गाला जोडलेली असली पाहिजेत आणि ती फक्त कोकण रेल्वेशीच जोडलेली असून चालणार नाहीत तर ती कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, हैदराबाद वा अन्य बिझिनेस हबसोबत रेल्वेलाईनने जोडली गेली पाहीजेत.

आज कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर धान्याची वाहतूक होते ती ट्रकवाहतुकीने! तळकोकणात व्यापारी संपर्काचे हेच साधन आहे. इतरत्र या सगळ्या गोष्टी रेल्वेमुळे हळूहळू कमी होत चालल्यात. वाहतूक व्यवस्थेतला वेग व सुरक्षितता वाढत आहे.

माल वाहतूक हा भविष्यामध्ये खूप मोठी गरज व संधी असलेला व्यवसाय आहे. कोळसा असेल, खनिज साहित्य असेल, साखर वा इथेनॉल असेल किंवा जे परदेशात पाठवली जाणारी निर्यातक्षम उत्पादने असतील, विजयदुर्ग बंदर आणि त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याचा होणारा विकास, औद्योगिक वाढ, रोजगारनिर्मिती या सगळ्याचा विचार करून हा रेल्वेमार्ग विकसित होणे गरजेचे होते. एकप्रकारे कोकण देशाच्या विकासमार्गाला जोडण्याचे कार्य माननीय प्रमोदजी जठार आणि माननीय श्री सुरेशजी प्रभु यांनी केले आहे. रेल्वेमंत्री असताना कोल्हापुरात त्यांनी या मार्गाला मंजुरी देणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी दै.पुढारीचे संपादक प्रतापराव जाधव यांनीही या मागणीला भक्कम पाठिंबा व्यक्त केला होता.

आज कोल्हापूर, सांगली परिसरात जी अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा दुसऱ्या पर्यायी रेल्वेमार्गाचे महत्त्व अधिक ठळकपणे आपल्या लक्षात आले आहे. गॅस, डिझेल, पेट्रोल डेपोना आज रस्ते मार्गाशिवाय पर्यायी दळणवळण सुविधा नाही आहे, हे या पूर परिस्थितीमुळे लक्षात आले. आता पाणी ओसरल्यानंतर आता पेट्रोल, डिझेल, पिण्याचे पाणी आणि अन्नपुरवठ्याची गरज भासणार आहे. संपूर्ण रस्तामार्ग उध्वस्त झाला आहे. भविष्यात अशा संकटाच्या वेळी पश्चिम महाराष्ट्राला एक वेगळी आणि महत्वाची संपर्कयंत्रणा या रेल्वेमार्गामुळे मिळणार आहे.

कुठेही श्रेयाच्या राजकारणात न अडकता अभ्यासूपणे वेगवेगळे प्रकल्प मांडून त्याचा पाठपुरावा भाजपा नेते करत आहेत. वैभववाडी- कोल्हापूर नव्या रेल्वेलाईन मंजुरी हे भाजपा नेते माननीय श्री प्रमोदजी जठार आणि माननीय श्री सुरेशजी प्रभू यांच्या दूरदृष्टीचे हे यश आहे. या यशातून त्यांनी भविष्याचा दीर्घकालीन वेध घेतला आहे. त्यांनी या सगळ्या विषयाकडे डोळसपणे पाहीले, एका वेगळ्या व्हिजनने पाहीले. कोकणाच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे त्रिवार आभार मानतो, असे अतुल काळसेकर यांनी म्हंटले आहे.

\