जिल्ह्यात आपत्तीने 40 कोटीचे नुकसान….

2

 

नारायण राणे:पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हा प्रशासनावर टीका

सिंधुदुर्गनगरी ता 12
आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तीस ते चाळीस कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हाणी झालेली असताना जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासन त्यांना दिलासा देताना कुठेच दिसले नाही. ही परिस्थिती हातळण्यास निष्प्रभ ठरले आहेत. एवढी मोठी नुकसानी झालेली असताना नुकसानग्रस्तांना आर्थिक मिळवून देण्यास पालकमंत्री निष्क्रिय ठरले आहेत, अशी टिका खा नारायण राणे यांनी सोमवारी केली.
पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये खा राणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला आ नितेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत उपस्थित होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्याचे प्रमुख पिक असलेले भात पिक बाद झाले आहे. जिल्ह्याचा दूध, डिझेल-पेट्रोल, भाजीपाला पुरवठा बंद झाला होता. जिल्ह्याचे रस्ते वाहून गेले आहेत. रस्ते आहेत की नाही ते समजत नाही. अनेकांचे जीव गेलेत. जनावरे मृत झाली आहेत. अशा परिस्थितीत मदत व दिलासा मिळवून देण्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन कमी पडलेत. वीज आठ-आठ दिवस गायब होती. आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यास ही यंत्रणा तत्पर नव्हती, हेच यातून स्पष्ट होते अशी टिका खा राणे यांनी केली.
पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे. त्यानंतर त्यांची राहण्या, जेवणाच व्यवस्था करणे गरजेचे असते. त्यामुळे नागरिक भयभीत व चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे याची नुकसानी मिळणार की नाही ? मिळाली तर ती किती प्रमाणात मिळणार. याची माहिती घेण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची आपण भेट घेणार आहे. नैसर्गिक आपत्तिपूर्वी असलेली स्थिती पूर्ववत होण्यासाठी आपली मागणी राहणार आहे. तसे न झाल्यास प्रसंगी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आंदोलन छेडणार आहे. मदतीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांजवळ मागणी करण्यात येणार आहे, असे यावेळी खा. राणे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी दोन कोटी रूपये मंजूर झाल्याचे सांगितले. हे दोन कोटी रूपये कोणाला पुरणार ? असा प्रश्नही यावेळी खा राणे यांनी केला. मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर आमचा पक्ष पुढील दिशा ठरवेल, असेही खा राणे यांनी सांगितले.

19

4