दीपक केसरकर : आचारसंहितेपुर्वी अमंलबजावणी, पूरग्रस्तांशी साधला संवाद
कणकवली, ता.12 ः खारेपाटण तालुका व्हावा अशी मागणी खारेपाटणवासीय गेली 40 वर्षापासून करत आहेत. आचारसंहितेपूर्वी नवा खारेपाटण तालुका अस्तित्वात येईल. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज खारेपाटण येथे दिली. या खेरीज सुखनदीपात्रातील गाळ उपसा करून खारेपाटण शहर पूरमुक्त करू. तसेच सुखनदीपात्रालगत संरक्षण बंधारा बांधून खारेपाटणवासीयांना महापुरापासून संरक्षण देण्याची व्यवस्था करू अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली.
गेल्या आठवड्यात महापुरामुळे खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. अनेक नागरिक आणि व्यापार्यांचेही यात नुकसान झाले होते. या पूरस्थितीची पाहणी श्री.केसरकर यांनी आज केली. यावेळी प्रभारी तहसीलदार आर.जे.पवार, जिल्हा परिषदेच्या अधिकारी अनामिका जाधव, सामाजिक कार्यकर्ते कांतप्पा शेट्ये, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, महेश कोळसुलकर आदी उपस्थित होते.
खारेपाटण शहरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील विष्णू मंदिरात श्री.केसरकर यांनी खारेपाटणवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील खारेपाटण हा नवा तालुका लवकरच निर्माण होईल. आचारसंहितेपूर्वी त्याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील अशी ग्वाही दिली. खारेपाटण शहर विजयदुर्ग खाडीवर वसले आहे. या खाडीतील गाळ काढण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर गाळ उपसा केला जाईल. तसेच शहराचे पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी संरक्षण बंधारे बांधले जातील अशी ग्वाही श्री.केसरकर यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या दौर्यात खारेपाटण बसस्थानक ते बंदरवाडी रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, घोडेपाथर बंदर रस्त्याची उंची सहा फुटाने वाढविण्यात यावी, पोलिस वसाहत, तलाठी कार्यालयाची दुरुस्ती व्हावी आदी मागण्या नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केल्या.