मदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश
मालवण, ता. १२ : सीआरझेडच्या जाचक अटींमुळे राज्याच्या किनारपट्टीवरील बंधाऱ्यासह अनेक कामे रखडली आहेत. मात्र आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून देवबाग, तळाशील तोंडवळी गावातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. देवबाग ते तारकर्ली या भागात समुद्रात अडीच किलोमीटर पर्यत जिओ ट्यूब टाकण्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करून या कामालाही कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी हे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे देवबाग समुद्र किनारपट्टीवरील रहिवाशांना दिलासा मिळाला असून येत्या आठवड्याभरात या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या व जिओ ट्यूबच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
समुद्री उधाणामुळे देवबाग किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत असून याठिकाणी असलेला बंधारा जीर्ण झालेल्या समुद्राने किनापट्टीचा भाग गिळंकृत केला आहे. समुद्री उधाणाचे पाणी किनारपट्टीलगतच्या नागरिकांच्या घरात घुसून नुकसान होत आहे. त्यामुळे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी लोकांनी आमदार नाईक यांच्याकडे मागणी केली होती. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राउत यांच्या माध्यमातून आमदार नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मालवण मधील बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करून घेतला. पालघर ते सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील अलीकडच्या काळातील मंजूर झालेले देवबाग बंधाऱ्याचे हे पहिले काम आहे.
यामध्ये देवबाग श्रीकृष्ण मंदिराजवळ (श्री भाऊ गोवेकर यांच्या घराजवळ) धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाख, देवबाग मोबारवाडी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांचा, तोंडवळी तळाशील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांचा निधी आमदार नाईक यांनी मंजूर करून आणला आहे. या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
तालुक्यात आमदार नाईक यांच्या माध्यमातून मसुरकर जुवा बेट, मसुरकर खोत जुवा, देवबाग ते तारकर्ली, तळाशील, सर्जेकोट पिरावाडी सुवर्णकडा, हडी बंदर पाणखोल जुवाबेट, श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर या समुद्र किनाऱ्यांवरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामांना परिमंडळ वन अधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या वृक्षाची व कांदळवनांची तोड न करता बंधाऱ्याच्या कामांना सुरवात करण्यास नाहरकत देण्यात आली आहे.