पदवीधरच्या २८७ पदांची भरती असताना १०२ पदे भरली…
सिंधुदुर्गनगरी ता.१३: राज्यात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने झालेल्या प्राथमिक शिक्षक भरतीचा निकाल जाहिर झाला असून पात्र लाभार्थीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात केवळ पदवीधरच्या २८७ शिक्षक पदांसाठी भरती लागली होती.गणित आणि विज्ञान या विषयासाठी ही भरती होती.यातील केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला १०२पदेच मिळाली आहेत.परिणामी नवीन भरती होवुनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची अजुन १८५पदे रिक्त राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्याध्यापकांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने व शासनाच्या आदेशानुसार या अतिरिक्त मुख्याध्यापकांना उपशिक्षक म्हणून नियुक्ति देण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील उपशिक्षकांच्या रिक्त पदासाठी भरती घेण्यात आलेली नाही. तर केवळ पदवीधर पदांच्या रिक्त पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. जिल्ह्यात २८७ पदवीधर रिक्त पदासाठी ही भरती झाली. मात्र, ही पदवीधर भरती गणित व विज्ञान या दोनच विषयासाठी झाली. ही प्रक्रिया पार पडली असून राज्यात या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांतील केवळ १०२ पात्र शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची मागणी केली आहे. या १०२ शिक्षकांना आपल्या कागदपत्रांची छाणनी करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. छाणनी प्रक्रियेनंतर या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती उमेदवार पात्र ठरले ही निश्चित होणार आहे. दरम्यान, १०२ पदवीधर पात्र उमेदवारांनी सिंधुदुर्ग मागितल्याने जिल्ह्यात अजुन १८५ पदवीधर शिक्षक पदे रिक्त राहणार आहेत.