श्याम सावंत: निधी व जागा उपलब्ध होण्यासाठी १५ ऑगस्टला आंदोलन…
सावंतवाडी.ता,१३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही आमची प्रथम मागणी आहे. मात्र हे मंजूर करताना झाराप ते बांदा या दरम्यानच्या गावातील उभारण्यात यावे,असा आमचा जनरेटा असेल. अशी भूमिका वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे अध्यक्ष श्याम सावंत यांनी आज येथे मांडली.
दरम्यान मंजूर झालेल्या महाविद्यालयासाठी जागा संपादित करण्याबरोबर तात्काळ निधीची सोय करण्यात यावी यासाठी १५ ऑगस्टला आम्ही प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा सावंत यांनी आज येथे दिला.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी लक्ष्मण नाईक, हेलन निब्रे, दीपक गावकर आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सात ठिकाणी शासकीय महाविद्यालय जाहीर करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. सद्यस्थिती लक्षात घेता येथील लोकांना आरोग्य उपचारासाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लागल्या. पुढे भविष्यात जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील ही कौतुकाची बाब आहे. परंतु हे महाविद्यालय उभारताना सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला व कुडाळ आदी भागातील लोकांना सोयीचे व्हावे यासाठी झाराप ते बांदा या दरम्यान हे महाविद्यालय व्हावे अशी आमची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी महाविद्यालय झाले. तर आमचा कोणताही विरोध नसेल परंतु त्याठिकाणी महाविद्यालय करताना कणकवली वैभववाडी मालवण आदी भागातील लोकांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे वैद्यकीय महाविद्यालय जवळ आहे. त्यामुळे दोडामार्ग वेंगुर्ला सारख्या डोंगर भागाचा विचार करून हे महाविद्यालय सावंतवाडी तालुक्यात व्हावे अशी आमची मागणी आहे. आम्ही पालकमंत्री दीपक केसरकर किंवा अन्य राजकीय लोकांकडून झालेल्या टीकेला किंवा विधानाला उत्तर देणार नाही. हा प्रश्न सुटावा लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. असे सावंत म्हणाले.