सिंधुदुर्गनगरी.ता,१३:
‘कोण म्हणतो देणार नाही, मागण्या आमच्या हक्काच्या, आमच्या मागण्या मान्य करा’ अशा घोषणा देत ग्रामसेवक युनियनकडून जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडण्यात आला. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पदाची निर्मिती करावी, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे लागू करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदल करून पदवीधर ग्रामसेवक होण्याबाबत निर्णय घेण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्गच्यावतीने येथील जिप भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाध्यक्ष संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिप भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग ग्रामसेवक युनियनचे जिल्हा सचिव गणेश बागायतकर, कार्याध्यक्ष प्रशांत वर्दम, उपाध्यक्ष संदीप गवस, स्वाती कदम, कोषाध्यक्ष मनमोहन धुरी, जिल्हा सहसचिव मंगेश राणे, सुहास पाटिल, संजय गावडे, सपना मसगे, उमेश राठोड, तालुका कार्यकारिणी, सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.
२०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढविण्यात यावे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रृटी दूर कराव्यात, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करण्यात यावी, एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करताना २० ग्रा. पं. मागे विस्तार अधिकारी मंजूरी मिळावी, नरेगा करता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनकडून हे आंदोलन करण्यात आले.
२२ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन छेडणार
क्रांतीदिनापासून ७ टप्प्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्टला पंचायत समिती नंतर आज दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १६ ऑगस्टला आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. चौथ्या टप्प्यात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ग्रामसेवक एकत्र होत निवेदन देतील. २० ऑगस्टला ग्रामविकास राज्यमंत्री आणि प्रधान सचिवांचे शासकीय निवासस्थानासमोर एकदिवसीय उपोेषण, २१ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना, संघटनेचे सर्व जिल्हा सचिव निवेदन देतील आणि अखेरच्या टप्प्यात २२ ऑगस्टपासून राज्यभर कामबंद आंदोलन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनकडून देण्यात आली.