अज्ञानी कंपनीवर पालकमंत्री मेहरबान का ?

2

रणजीत देसाई ; चांदा ते बांदा योजनेबाबत जिल्हा नियोजन सभेत विचारणार जाब

सिंधुदुर्गनगरी.ता,१३: चांदा ते बांदा योजनेतील केवळ शेळ्या-मेंढ्या पुरविणे ही योजना डीबीटीद्वारे राबविली जात आहे. तर दुधाळ जनावरे व कुक्कुट पक्षी पुरविण्याठी मुंबई येथील एका कंपनीला समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. या कंपनीला या व्यवसायाचा पूर्वानुभव नाही. तरीही पालकमंत्री या कंपनिवर मेहरबान का ? असा प्रश्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी करीत या विषयावर बुधवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन सभेत पालकमंत्री यांना घेरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पशुधन व दुग्ध विकास समितीची सभा मंगळवारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात झाली. यावेळी प्रभारी अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, सदस्य अनुप्रिती खोचरे, सावी लोके, मनस्वी घारे, स्वरूपा विखाळे आदी उपस्थित होते. मागील सभेत चांदा ते बांदा योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पशुधन विभागाच्या योजनांची माहिती राज्य पशुधन विभागाकडे मागितली होती. ही माहिती जिल्हा कार्याल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ गोसावी यांनी सादर केली. यावेळी अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नसल्याचे डॉ गोसावी यांनी सांगितले.
डॉ गोसावी यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारावर बोलताना उपाध्यक्ष देसाई यांनी, कुक्कुट ग्राम योजनेसाठी तीन कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद असून यासाठी ७ प्रस्ताव अपेक्षित आहेत. मात्र आतापर्यंत ३ प्रस्ताव आले आहेत. दुधाळ जनावरे पुरविण्यासाठी २ कोटी ६७ लाख रूपये मंजूर केले आहेत. यासाठी १२०० प्रस्ताव अपेक्षित असताना १७१ प्रस्ताव निवड झाले आहेत. शेळी-मेढीसाठी ७५० प्रस्ताव अपेक्षित असताना २५२ प्रस्ताव निवडण्यात आले आहेत. यासाठी १ कोटी ८४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद आहे. आतापर्यंत केवळ लाभार्थी निवड करण्यात आलेली असताना पालकमंत्री यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात योजनेच्या लाभार्थ्याना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप केले. जर प्रत्येक्षात वाटपच सुरु झाले नाहीतर पालकमंत्री यांनी आपल्या पक्षीय कार्यक्रमात शासकीय वाटप असल्याचे का भासविले ? असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला.
तसेच ३ हजार गायी-म्हैशी, साडे सात हजार शेळी-मेंढी व २ लाख कोंबड्या पुरविण्याचा ठेका केवळ आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या नवीन कंपनीला का दिला ? त्याच प्रमाणे शासनाच्या प्रत्येक योजना डीबीटीद्वारे राबविण्याच्या असताना दुधाळ जनावरे व कुक्कुट ग्राम या योजनेसाठी समन्वयक कंपनी का नियुक्त केली ? ही कंपनी दुधाळ जनावरे व कुक्कुट पक्षी पुरविल्यानंतर दूध व अंडी आपणच घेणार आहे. यामुळे लाभार्थिचे नुकसान होणार नाही का ? दुधाळ जनावरांसाठी जिल्ह्यात १२०० प्रस्ताव अपेक्षित असताना सावंतवाडी विधानसभा मतदार संघात ७२० प्रस्ताव येतात. कणकवली मतदार संघातून केवळ ९५ प्रस्ताव येतात. दोडामार्ग तालुक्यात २९८ प्रस्ताव येत असताना कणकवली तालुक्यातून ४६ प्रस्ताव आले. यावरून पालकमंत्री आपल्या मतदार संघातच ही योजना प्रभावी राबवित आहेत ? असे स्पष्ट होत असल्याचा आरोप यावेळी देसाई यांनी केला. या विषयवार जिल्हा नियोजन सभेत पालकमंत्री यांना घेरण्याचा इशारा यावेळी देसाई यांनी दिला.

14

4