एम.के.गावडे; नुकसानीचे तात्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी…
वेंगुर्ले ता.१३: आठ दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात झालेली नैसर्गिक आपत्ती भरून न येणारी आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेले नुकसानही कमी नाही.जिल्ह्यातील बहुतांश रस्ते हे वाहतूक योग्य राहिलेले नाहीत.शेतीचे नुकसान झालेला आहे.या सर्वांचा तातडीने सर्वे होऊन वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर होणे आवश्यक होते.मात्र नैसर्गिक आपत्ती घडून आठ दिवसांनंतरही तालुका लेव्हलचे महसूल अधिकारी पाहणीच करत आहेत.जिल्हाधिकारी, आयुक्त यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला धीर देणे आवश्यक होते.परंतु काही ठिकाणी तुटपुंजी मदत देऊन स्वतःला देवदूत म्हणवून घेणे योग्य नाही,असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के. गावडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
वेंगुर्ले तालुक्यात डोंगर खचत आहेत, पाळीव जनावरांची कुचंबणा होत आहे त्यासाठी कुणीही जनावरांची व्यवस्था करीत नाही. अडचणीच्या जागी प्रतिनिधी जातात व सोयीच्या जागेवर लोकप्रतिनिधी जातात. हे व्यवहार्य दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. वास्तविक तुळस पलतडवाडीमध्ये पंतप्रधान सडक मधून रस्ता बनविताना डोंगर कापला गेला त्याच वेळी संरक्षक भिंत बांधून पाण्याला योग्य वाट करून दिली असती तर कदाचित नुकसानीची तीव्रता कमी झाली असती. कोकणातील गणेशोत्सव या प्रमुख उत्सवाला सुरुवात होणार आहे यासाठी राज्याच्या देशाच्या ठिकाणी कार्यरत असलेला माणूस गावाकडे येत असतो त्यामुळे रस्त्याची डागडुजी त्वरित होणे आवश्यक आहे. वारंवार डांबरीकरण, रस्त्यावरून पाणी हे नित्याचेच झाले आहे. तुळस पलतड रस्त्याच्या कामात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये तो उखडल्यामुळे ते स्पष्टपणे दिसत आहे. जिल्ह्यामध्ये बहुतांश भातशेती वाहून गेली आहे. कोकणात दुबार पेरणीची शक्यता नसल्याने त्या भातशेतीचे पंचनामे सुद्धा त्वरित विना विलंब होणे आवश्यक असून शेतकऱ्यांना वाचवणे गरजेचे आहे. चोवीस तासाच्या आत शासकीय यंत्रणा सक्रिय होणे आवश्यक होते परंतु दुर्दैवाने शासकीय अधिकारी मदत करण्याऐवजी नियमावर बोट ठेवत होते. राजकीय पुढाऱ्यांन प्रमाणे भेटी देत होते. आपत्ती व्यवस्थापनाचे फोन आऊट ऑफ रेंज होते व पुनर्वसन मंत्री सुरक्षा जॅकेट चढवून सेल्फी घेण्यात दंग होते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळाची भीषण अवस्था आहे त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेले नुकसान कमी नाही. नैसर्गिक आपत्तीत शासकीय तक्ते बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर होणे आवश्यक आहे. याची नोंद संबंधित अधिकारी शासनाने घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन बधितांना तात्काळ मदत मिळणे गरज आहे असेही ते म्हणाले.