नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करा कृषी समिती सभेत मागणी

129
2

सिंधुदुर्गनगरी.ता,१३:अतिवृष्टीमुळे जिल्हयातील भातशेतीसह उसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा असे आदेश देतानाच शास्त्रज्ञांमार्फत जिल्ह्यातील भूस्खलनाची कारणे शोधून तसा चौकशी अहवाल सादर करण्यात यावा असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती रणजित देसाई यांनी घेतला.
जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सभा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य अमरसेन सावंत, गणेश राणे, सुभाष देसाई, सायली सावंत, अनुप्रिती खोचरे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात शेती व ऊसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेती तर कित्येक तास पाण्याखाली गेल्याने आडवी झाली असून ती कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पुरता संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीची पहाणी करून सर्वे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे त्यादृष्टीने कार्यवाही करा. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. डोंगर सरकले आहेत. जमीन खचली आहे. या गोष्टी भविष्यात धोकादायक आहेत. याची कारणे शोधणे गरजेचे आहे. यासाठी एका शास्त्रज्ञांच्या टिम च्या मदतीने भूस्खलन झालेल्या ठिकाणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा अशा सूचना उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कृषी अधिका-यांना दिल्या.
डीबीटी धोरणानुसार लाभार्थ्यांनी अवजार खरेदी केली. त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी बॅकेत पैसेही जमा केले. मात्र बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. तांत्रिक चुकांमुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आता यापुढे डिबीटीची अनुदान जिल्हा बँकेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या मुद्यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. या चर्चेत सभापती रणजीत देसाई, गणेश राणे, अमरसेन सावंत यांनी सहभाग घेतला होता.

4