संघटनेने घेतली वीज अधिका-यांची भेट:पुरवठा सुरळीत करण्याची मागणी…
दोडामार्ग ता.१३: शहरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे त्याचा परिणाम गणेश मूर्ती शाळेवर होत आहे.अवघ्या काही दिवसांवर चतुर्थी येऊन ठेपल्यामुळे समस्या निर्माण झालेल्या आहेत.त्यामुळे योग्य त्या उपाययोजना राबविण्यात याव्या अशी मागणी कसई दोडामार्ग येथील मूर्ती संघटनेच्यावतीने वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रवींद्र देहारे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मागील काही दिवसात तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली होती.त्याचा फटका सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसला आहे.त्यातच अवघ्या काही दिवसात गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे.असे असताना दोडामार्ग तालुक्यातील विज वारंवार खंडित होत राहते.त्यामुळे गणेश मूर्ति रंगविताना अडथळा निर्माण होत आहे.लोकांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य तोडगा काढण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी रामचंद्र मणेरीकर, सुभाष पेडणेकर, रामदास बागकर, गजानन तळवडेकर, व भाजपचे कार्यकर्ते योगेश महाले, रंगनाथ गवस आदि उपस्थित होते.दरम्यान देहारे यांनी आम्ही तात्काळ यावर उपाय योजना करु असे सांगितले.