तुम्हाला हवा असलेला उमेदवार देणार…

354
2
Google search engine
Google search engine

मतांची टक्केवारी ४५ वरून ८० टक्क्यांवर नेण्यासाठी उद्यापासून कामाला लागा ; खास. नारायण राणे…

मालवण, ता. १३ : मागील विधानसभा निवडणुकीत माझा झालेला पराभव कधीही विसरणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत मालवणातून ५० हजार तर मतदार संघातून मला ८० टक्के मतदान मिळायला हवे. त्यामुळे गावागावात, घराघरात जाऊन प्रचार करा. यासाठी उद्यापासूनच कामाला लागा अशा सूचना स्वाभीमानचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी आज येथे केल्या.
येथील दैवज्ञभवन सभागृहात तालुक्यातील स्वाभीमानचे आजी, माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती सोनाली कोदे, बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, सरोज परब, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, राजन सरमळकर, अशोक तोडणकर, अशोक बागवे, महेश जावकर, लीलाधर पराडकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.
मालवणबद्दल माझ्या मनात आदर व अभिमान आहे. याच मतदार संघातून सहावेळा आमदार झालो. मागील निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला. ही सल माझ्या मनात कायम राहील. गेल्या पाच वर्षात पालकमंत्री, खासदार, आमदार आपला नाही. मी आज राज्यसभा खासदार आहे हे असे यापूर्वी होते का? याचा जनतेने विचार करायला हवा. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव झाला. जिल्ह्यातून दीड लाखाचे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती तसे झाले नाही. मला ९० पासून ८० टक्के मिळायची. नीलेश राणेंना ३५ टक्के मते कमी मिळाली. त्यामुळे मी आमदार, मंत्री असताना कुठे कमी पडलो का? असा प्रश्‍न राणेंनी उपस्थित केला.
पावसापूर्वी झालेल्या रस्त्यांची अवस्था पुन्हा दयनीय झाली आहे. मी आणलेले प्रकल्प बंद केले. गेल्या पाच वर्षाच्या काळात रोजगाराचा एखादा प्रकल्प आला का? रस्ते, पाणी, वीज, आरोग्य याबाबत कोणी काहीही बोलत नाही. पूरपरिस्थितीमुळे विहीरींमधील पाणी दूषित झाले आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्याची, मतदार संघाची अधोगती झाली आहे. मालवण पर्यटन तालुका असल्याने येथील तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच जिल्ह्याचा आर्थिकदृष्ट्या कायापालट करण्यासाठी सी-वर्ल्ड प्रकल्प आणला. मात्र त्याला विरोध झाला. हा प्रकल्प झाला असता तर मोठे परिवर्तन झाले असते. रोजगार मिळाला असता. मात्र वैभवला ते कळले नाही आणि आयुष्यात कधी कळणारही नाही. मच्छीमारांची अवस्था बिकट असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मला पुढारी मानत असाल तर माझा संपूर्ण समाज उपासमारीत असता कामा नये अशी माझी भावना आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत ४५ टक्के मते होती आता ८० टक्के मते मिळायला हवीत. त्यामुळे लोकांपर्यंत पोहचा. जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर आमचे वर्चस्व आहे. फक्त आमदार, खासदार आमचे नाहीत. त्यामुळे सर्वांनी उद्यापासूनच कामाला लागा. चर्चा नको. तुम्हाला हवा असलेला उमेदवार देणार आहे.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी स्वाभीमान पक्षाच्यावतीने मदत करण्यात आली आहे. मात्र ती पुरेशी नाही. त्यामुळे अधिक मदत करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून निधी गोळा करण्याचे काम केले जाईल. देवबाग बंधार्‍यासंदर्भात छेडलेल्या उपोषण आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.