दिलीप पांढरपट्टे; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन…
सिंधुदुर्गनगरी ता.१३:जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे दूध,फळे,भाज्या व धान्य आदि महत्त्वाच्या व जीवनावश्यक गोष्टी येण्यासाठी आंबोली घाटातील एकेरी मार्ग येत्या चार दिवसात सुरू करण्याचा आमचा युद्धपातळीवर प्रयत्न आहे.असे आश्वासन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले,आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक अर्चना घारे-परब यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात पाणी भरले होते. पुराचे पाणी घरात शेतीत शिरल्याने येथील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे धरणे पुर्ण भरली आहेत. डोंगर कोसळत आहे. जमिनींना तडे गेले आहेत. भूसख्खलन होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तिवरे आणि माळीण सारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या लहान मोठ्या धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, भुसख्खलनाच्या पार्श्वभूमीवर त्यात्या ठिकाणच्या जमिनीचे भुगर्भशास्त्रज्ञ यांच्या मार्फत आवश्यकत्या चाचण्या करून घ्याव्यात, धोका असलेल्या गावांना त्वरित स्थलांतर करण्यात यावे, घाटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे मोकळी करण्यात यावीत.आंबोली घाट मार्ग बंद केल्याने अनेक जीवनावश्यक वस्तुंचा तुटवड़ा भासत आहे. तसेच येथील व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आंबोली घाटमार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक अर्चना घारे-परब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.