रस्त्यावर सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांच्या स्वाधिन…
वेंगुर्ले ता.१३: शहरातील गांधी मिठाई दुकानदार सदानंद तुळशीदास गिरप यांनी आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर मिळालेले सोन्याचे मंगळसूत्र वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात देवून प्रामाणिकपणा दाखविला. दरम्यान ज्या कोणाचे हे मंगळसूत्र असेल ते त्यांनी ओळखपटवून घेवून जावे असे आवाहन पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांनी केले आहे.
वेंगुर्ले बाजारपेठेत गिरप यांचे मिठाई दुकान आहे. काल सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकाना समोरील रस्त्यावर सोन्याचे मंगळसूत्र पडलेले दिसले ते मंगळसूत्र त्यांनी उचलून दुकानात आणले. आजुबाजुला या बाबत चौकशी केली असता ते कोणाचे असल्याचे समजले नाही. म्हणून त्यांनी मंगळसूत्र सापडल्याचा फलक लावला मात्र रात्री पर्यंत कुणीही याबाबत विचारण्यासाठी आले नाही मात्र आज वेंगुर्ले पोलिस ठाण्यात मंगळसूत्र चोरीस गेल्याची तक्रार दाखल असल्याचे समजताच श्री. गिरप यांनी तात्काळ ते मंगळसूत्र वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिले. पोलिस निरिक्षक श्री खोत यांच्या उपस्थितीत उपनिरिक्षक रुपाली गोरड यांनी ते स्विकारले आहे. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहरअध्यक्ष जयंत मोंडकर, पोलिस उपनिरिक्षक सचिन सावंत, प्रवीण नाईक, पोलिस हवालदार सुर्याजी नाईक आदि उपस्थित होते. दरम्यान श्री खोत यांच्यासह पोलिसांनी श्री. गिरप यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.