नीतेश राणे; पंचायत समितीच्यावतीने महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
कणकवली, ता.13 ः बचतगटातून उत्पादित होणार्या मालासाठी मार्केटींग अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी आणि सदस्यांनी मार्केटींगची जबाबदारी उचलावी. लोकप्रतिनिधी हा महिलांच्या समृद्धीसाठी तसेच उद्योजक व महिला बचत गट यांच्यामधील दुवा असला पाहिजे असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.
कणकवली पंचायत समितीच्यावतीने आज येथील भगवती मंगल कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली. याचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, महिला व बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, कणकवलीच्या सभापती सुजाता हळदिवे, उपसभापती सुचिता दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, स्मिता मालडीकर, दिव्या पेडणेकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, प्रकाश पारकर आदि उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, बचतगटांच्या उत्पादित मालाच्या मार्केटींगसाठी चौकटीबाहेर जाऊन काम करायला हवे. देशाच्या विविध भागात मार्केटींग कसे होते याची माहिती करून घेण्यासाठी अभ्यास दौरे करायला हवेत. अशा अभ्यास दौर्यांसाठी पंचायत समितीने निधीचा उपयोग करावा. याखेरीज महिलांपर्यंत जास्तीत-जास्त तंत्रज्ञान पोचविले पाहिजे.
ते म्हणाले, महिलांसाठीच्या प्रशिक्षणांमधून त्यांना किती फायदा झाला? त्यांच्या कुटुंबांत अशा प्रशिक्षणांनी समृद्धी आली का? याचे मुल्यमापन व्हायला हवे. त्यासाठी गतवर्षीच्या प्रशिक्षणाचा वस्तुनिष्ठ अहवाल या प्रशिक्षणात सादर केला पाहिजे.