दोडामार्ग पुरग्रस्तांना देणार जीवनावश्यक वस्तु…
सिंधुदुर्गनगरी ता.१३: जिल्हा मुख्यालयाचा एक भाग असणारे आमचं रानबांबुळी गाव तसं आकाराने आणि वस्तीने फार काही मोठं नाही,इथे गावाची अशी व्यापारी पेठ नाही की कोणता उद्योग धंदा नाही,पण एक आहे,गावातली माणसं मात्र मोठ्या मनाची.आणि याचा प्रत्यय अनेकदा येतो.
राज्यातीलंच नव्हे तर देशातील प्रत्येक मन आज ज्या गोष्टींमुळे अस्वस्थ आणि संवेदनशील बनलेलं आहे त्या भीषण पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा प्रत्यय आज पुन्हा एकदा नव्याने आला.
गावातील सामाजिक उपक्रमासाठी स्थापन झालेली आरंभ प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था आणि आमची ग्रामपंचायत रानबांबुळी यांची आज सकाळी बैठक पार पडली. पूरग्रस्त बांधवांना मदत हा अजेंड्यावर असणारा विषय सुरू झाला आणि केवळ विषयाच्या प्रस्तावने दरम्यान संपला सुद्धा..उपस्थित वीस पंचवीस कार्यकर्ता मंडळींचा हात लागलीच खिशात/पर्स मध्ये गेला आणि कागदावर नावं लिहायची उसंत सुद्धा न मिळता तब्बल 25 हजाराची पुंजी टेबलावर जमा झाली.
मग ठरलं आज जे बैठकीला उपस्थित नाहीत त्यांना फोन किंवा प्रत्यक्ष भेटीने संपर्क करावा.लागलीच तेही काम पार पडलं. दुपारचा अवघा एक दीड तास आणि संध्याकाळचा एक दीड तास असं मिळून तीन तासाच्या लोकभेटीत पुन्हा 26 हजार रुपयांची भर सकाळच्या पुंजीत जमा झाली. 55000 रुपये निधी आज जमा झाला.
उद्या सकाळी आजच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्या पूरग्रस्त गावातील 55 कुटुंबाना प्रत्येकी एक हजार रुपयांची जीवनावश्यक वस्तूंची (तांदूळ,डाळ, कडधान्य,पिठी,साखर, चहा पावडर, मीठ, मसाला, मसाल्याचे पदार्थ, लोणचे, माचीस, मेणबत्ती, अगरबत्ती, डेटॉल, साबण, पेस्ट, मच्छर अगरबत्ती, ओडोमॉस, फिनेल इत्यादी वस्तू प्रेमाची भेट दोडामार्ग येथील संबंधित पूरग्रस्त गावात रवाना होईल.उद्या सकाळी 10 वाजता या वस्तूंचे गरजुंना वितरण करण्यात येणार आहे.
कल्पना आहे की, जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या दोन तीन जिल्ह्यात पुराचं संकट फार मोठं आहे.मदतीची गरज खूपच मोठी आहे.आपलं सरकार, स्वयंसेवी संस्था,दानशूर व्यक्ती असे सर्वजण यासाठी तन मन धन अर्पून अहोरात्र झटत आहेत.
त्यात आमच्या रानबांबुळी गावचा हा खारीचा वाटा.
आणि गावच्या या संवेदनशीलतेला एक कडकडीत सलाम..
या निधी संकलन साठी आरंभचे अध्यक्ष प्रभाकर सावंत , सरपंच वसंत बांबुळकर, आरंभ सचिव संजय लाड, उपसरपंच सतीश परब, परशुराम परब, बबनकाका परब, कोकितकर सर सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरंभचे पदाधिकारी आणि सदस्य या सर्वांनी पुढाकार घेतला.